मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या 'श्वास' या चित्रपटानंतर संदीप सावंत दिग्दर्शित आगामी 'नदी वाहते' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आताच्या काळात आपल्या गावातली नदी जगवणं, ती वाहती ठेवणं हे मोठं आव्हान आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर 'नदी वाहते' बेतला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारात या चित्रपटाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांनी सहज फिल्म या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, नीरज व्होरालिया यांनी संकलन, लोकेशन साउंड सुहास राणे,साउंड  डिझाईन मंदार कमलापूरकर,पार्श्वसंगीत तुषार जयराज तर कलादिग्दर्शन, वेशभूषा नीरजा पटवर्धन यांनी केलं आहे. 


सिंधुदुर्गातील कुडाळ, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांचा पश्चिम घाटाच्या पायथ्याचा भाग तसेच नॉर्थ गोव्यातील वाळपई, साखळी आणि सत्तेरी आदी  भागांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आज तुमच्या माझ्या गावातील नदी वाचवायची, नदीचा काठ पुन्हा एकदा जिवंत करायचा, म्हणजे काय ? ह्या शोधाचा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी सांगितले.