VIDEO : रितेश-नागराज साकारणार शिवरायांची `महागाथा`
महाराजांची `महागाथा` मोठ्या पडद्यावर
मुंबई : सिनेसृष्टीत बायोपिकची चलती असताना आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वराजाच्या महागाथेचा अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निर्मिती असलेला 'महागाथा' हा सिनेमा नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रितेश छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमा बनवणार असल्याची चर्चा सगळीकडे होती. अखेर या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. नागराजने या सिनेमाची अधिकृत घोषणा करणारा टीझर ट्विट केला आहे.
“एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,” असं म्हणत नागराजने चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नागराज म्हणतो, “आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट)” .... अशी पोस्ट नागराजने शेअर केली आहे.
या सिनेमाची पहिली झलक पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नागराज मंजुळे, रितेश देशमुख आणि अजय-अतुल अशी मंडळी एकत्र आल्यावर काहीतरी उत्तमच घडणार याचा विश्वास प्रत्येकाला आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.