`नाळ` सिनेमाचा पहिल्याच आठवड्यात विक्रम
बॉक्स ऑफिसवर गाठला हा आकडा
मुंबई : मराठी प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होता. त्या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज आठवडा झाला आहे. तो सिनेमा म्हणजे झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे प्रस्तुत 'नाळ'. सुधारकर रेड्डी दिग्दर्शित नाळ हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अगदी सातच दिवसांतच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे.
सर्वत्र हाऊसफुल्लचा बोर्ड लावत या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात करोडोंची कमाई केली असून विक्रम रचला आहे. नागराज मंजुळे म्हटलं की सिनेमा इतिहास रचणार यात शंकाच नाही आणि पुन्हा एकदा ते अधोरेखित झालं आहे. 'नाळ' या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 14 करोड रुपयांची कमाई केली असून विक्रम रचला आहे.
श्रीनिवास पोकळेने चैत्याची भूमिका इतकी सुंदर निभावली आहे की, प्रत्येकाला ती आपलीच कथा वाटत आहे. लहान मुलाचं भावविश्व सुधाकर रेड्डीच्या या कथेत आहे. त्याला नागराज मंजुळेने जोडलेले संवाद अतिशय मनाला भावतात. आई आणि मुलाला जोडणारी 'नाळ' इतक्या प्रभावीपणे या सिनेमात मांडली आहे की प्रत्येकाला त्याचं वेगळेपण अधोरेखित झाल्या शिवाय राहत नाही.
नागराजच्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सिनेमातील कलाकार. ज्या कलाकारांनी अभिनय क्षेत्रात काहीच काम केलेलं नसतं अशांना घेऊन नागराज सिनेमा करतो. तसाच श्रीनिवास या सिनेमात नवीन बालकलाकार आहे. तसेच नागराजने स्वतः या सिनेमात चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे त्यामुळे हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरतो.
फक्त शहरातीलच नाही तर ग्रामीण प्रेक्षकांना प्रेक्षकगृहापर्यंत घेऊन येण्याची ताकद ही नागराजमध्ये आहे. नाळ हा सिनेमा मुंबई, पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही प्रदर्शित झाला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नाळ हा सिनेमा 450 चित्रपटगृहांमध्ये 11 हजार शोच्या माध्यमातून दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.