मुंबई : सामाजिक विषयांवर हटके चित्रपट बनवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एक नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र या चित्रपटात ते मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. 'द सायलेन्स' या सत्य घटनेवर आधारित चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी फँड्री आणि सैराट चित्रपटात त्यांनी लहान सहान भूमिका केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरीब घरातली चिनी आपल्या वडिलांसोबत राहत असते. पण, गरिबीमुळे तिचा सांभाळ करणं त्यांना कठीण होतं आणि ते तिला काकांकडे शहरात पाठवतात. त्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलतं, कोणत्या घटनेचे तिच्या मनावर काय परिणाम होतात, ही 'द सायलेन्स' चित्रपटाची कथा आहे. समाजातील विविध पैलूंवर, अपप्रवृत्तींवर हा सिनेमा भाष्य करतो. अॅड. पूजा कुटे यांच्याकडे आलेल्या एका खटल्यावर चित्रपटाची कथा बेतली आहे. 


मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या धाटणीचे अनेक सिनेमे देणाऱ्या गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. आतापर्यंत ३५ हून अधिक चित्रपट महोत्सवांमध्ये समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे आणि १५ पुरस्कार देखील मिळवले आहेत. 


या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.