Nana Patekar on Viral Video : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा काल वाराणसीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओत नाना पाटेकर हे एका चाहत्यानला कानशिलात लगावताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावरून त्यांना खूप ट्रोल देखील करण्यात आलं होतं. नाना पाटेकर हे त्यांच्या 'जर्नी' या चित्रपटाचं शूटिंग दशाश्वमेध घाट येथे करत होते. शूटिंग करत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी जोरात कानशिलात लगावली. यानंतर त्यांच्यावर सुरु असलेल्या टीकेवर नाना पाटेकर यांनी स्पष्टिकरण दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर यांच्या टीमनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर बोलताना दिसत आहेत की 'एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मी एका मुलाच्या कानशिलात लगावताना दिसतोय. हा सीन आमच्या चित्रपटातील आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. आम्ही दुसरी रिहर्सल करणार होतो. दिग्दर्शकानं मला हा सीन सुरु करण्यासाठी सांगितलं. आम्ही रिहर्सल सुरु करणार तितक्यात व्हिडीओत दिसणारा मुलगा आला. तो कोण आहे हे मला माहित नव्हतं? मला वाटलं की तो आमच्या क्रु मेंबर्सपैकी कोणी आहे. त्यामुळे त्या सीन प्रमाणे मी त्याला कानशिलात लगावली आणि त्याला जाण्यास सांगितलं. त्यानंतर मला कळलं की तो आमच्या क्रुचा भाग नाही. त्यामुळे मी त्याला परत बोलावलं, पण तो पळून गेला. असं वाटतंय की त्याच्या मित्रानं हा व्हिडीओ शूट केला असेल. मी कधीच कोणाला फोटो काढण्यास नकार दिलेला नाही. मी कधीच असं नाही करतं. जे काही झालं ते चुकीचं आहे. काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही. त्याची मला माफी मागायची आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न देखील केला. '



हेही वाचा : नाना पाटेकरांनी चाहत्याला भर रस्त्यात फणकावलं, पाहा नेमकं काय झालं?


दरम्यान, नाना पाटेकर काम करत असलेल्या या ‘जर्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गदर 2’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा करत आहेत. या चित्रपटाची घोषणा सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या चित्रपटाच्या यशानंतर करण्यात आली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘जर्नी’ मध्ये त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे.