मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची आई निर्मला पाटेकर यांचं वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झालंय. मंगळवारी २९ जानेवारी रोजी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्या गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होत्या. त्यामुळे नाना पाटेकर यांनी आईला मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी हलवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी 'वेबसाईट बॉलिवूड लाईफ'नं दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या आई निर्मला या विस्मृतीनंही त्रस्त होत्या. आपल्या आजुबाजुच्या लोकांनाही ओळखणं त्यांना कठिण बनलं होतं. 


निर्मला पाटेकर यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकार त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. 


फाईल फोटो : नाना पाटेकर आई निर्मला पाटेकर यांच्यासोबत

नाना पाटेकर आपल्या वृद्ध आईची काळजी घेताना दिसत होते... त्यासाठीच ते आईसोबत वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी आपली जवळपास सर्व मिळकत दान केली होती. त्यानंतर ते या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. सध्या ते जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत व्यतीत करताना दिसतात.


काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या आईविषयी बोलताना नाना पाटेकर भावूक झाले होते. 'मी जेव्हाही आईबद्दल बोलत असतो तेव्हा मला काहीतरी होतं... मला माहीत आहे की ती या जगाचा कधीही निरोप घेऊ शकते, त्यामुळे जेव्हा मला फोन येतो तेव्हा मी घाबरतो. जेव्हाही आई मला बाहेर जाताना पाहते, तेव्हा ती माझा हात पकडते आणि रडायला लागते' असं त्यांनी म्हटलं होतं.