अजमेर: अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना शुक्रवारी हिंदू संघटनांच्या विरोधामुळे अजमेर साहित्य संमेलनात जाण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला. नसीरुद्दीन शाह यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार होते. मात्र, आयोजकांच्या विनंतीनंतर त्यांनी कार्यक्रमाला जाण्याचा बेत रद्द केला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर हिंसाचाराविषयी भाष्य करताना नसीरुद्दीन शाह यांनी या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. मात्र, नसीरुद्दीन शाह आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. मी एक भारतीय आहे. या देशाबद्दल मला जे प्रश्न पडले आहेत ते मी उपस्थित केले त्यात माझे काय चुकले की मला गद्दार ठरवले जाते आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांनी त्यांना अजमेर साहित्य संमेलनात येऊ न देण्याचा निर्धार केला होता. नसीरुद्दीन शहा आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार होते. यावेळी ते एका परिसंवादतही सहभागी होणार होते. मात्र, भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच याठिकाणी निदर्शने सुरु केली. या कार्यकर्त्यांनी नसीरुद्दीन शहा यांची पोस्टर्स जाळली. 


वादग्रस्त वक्तव्याला विरोध झाल्यावर नसीरूद्दीन शाह यांची सारवासारव


याबद्दल आयोजकांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, आम्ही सकाळीच पोलिसांना कळवले होते. परंतु, संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच काही आंदोलकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश मिळवला. त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. अखेर आम्ही नसीरुद्दीन शहा यांना फोन करून येथे न येण्याची विनंती केली, असे संमेलनाचे आयोजक रास बिहारी गौर यांनी सांगितले.