मुंबई : कलाजगतामध्ये भक्कम स्थान निर्माण करण्याचा प्रवास प्रत्येक वेळी सोपाच असेल असं नाही. आज असे किती कलाकार आहेत ज्यांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करत आपली ओळख निर्माण केली. मायानगरीमध्ये येऊन प्रसिद्धीच्या शिखरापर्यंत पोहोचणाऱ्या याच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आपलंही घर असावं असंच या हरहुन्नरी अभिनेत्याचं स्वप्न. ज्यासाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतली. शहराचा कानाकोपरा पालथा पाडला, तेव्हा कुठे जाऊन इतक्या वर्षांनंतर त्याच्या स्वप्नांचा महाल उभा राहिला. 


सध्या सोशल मीडियावर कोणता चित्रपट किंवा वेस सीरिजची नाही, तर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)च्या आलिशान बंगल्याची चर्चा सुरु आहे. 


दशकाहून अधिक काळ या चित्रपट विश्वात सक्रिय असणाऱ्या नवाजनं अखेर मुंबईत मोठं घर उभारलं, या घराच्या इंटेरियर डिझायनिंगचं काम त्यानं आपल्याच खांद्यांवर घेतलं. 


तीन वर्षे त्यानं या घराच्या उभारणीसाठी मेहनत घेतली. ज्याची आखणी बुढाना येथील त्याच्या जुन्या घरापासून प्रेरित आहे. 


असं म्हणतात की काही गोष्टींशी आपली नाळ कायमची जोडलेली असते. बहुधा नवाझचं जुनं घर आणि आपली माणसं यांच्याशी त्याची अशीच नाळ जोडलेली असावी. 


कारण, त्यानं या महालवजा घराला आपल्या वडिलांचं नाव दिलं आहे. 'नवाब' ही त्याच्या घराची शाब्दिक ओळख. 


एक कलाकार जेव्हा संघर्ष करून मोठा होतो आणि प्रेक्षक त्याचा हा प्रवास पाहतात तेव्हा त्याच्याप्रती असणारा आदर आपोआपच वाढतो. 


नवाझच्या बाबतीत असंच काही. प्रेक्षकांच्या प्रेमासोबत या अभिनेत्याला त्यांच्याकडून तितकाच आदरही मिळतो. आता याच अवलियाला त्याच्या या नव्या घरासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. 


पांढऱ्याशुभ्र महालासारखीच ही वास्तू उभी आहे. भव्य प्रवेशद्वार, मोठाले कलाकुसर केलेले खांब, जाळीदार कुंपण अशीच त्याच्या या घराची रचना आहे. 




व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये पाहिलं असता घराच्या दाराची ठेवणही तितकीच लक्षवेधी असल्याचं लक्षात येत आहे. 


जुन्या-नव्याची सांगड घालत आठवणी जपणारा नवाझचा हा आशियाना तुम्हाला कसा वाटला?