बलिदान.... नेमकं कोणाकोणाचं? `सेक्रेड गेम्स २`च्या निमित्ताने मीम्सना उधाण
`बलिदान तो देना होगा....`
मुंबई : वेब सीरिजच्या अफलातून दुनियेत नुकताच एक जुना खेळाडू नव्या अंदाजात आला आहे. हा खेळाडू म्हणजे २०१८ मध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेली नेटफ्लिक्सची ओरिजिनील वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीचा आधार घेत साकारण्यात आलेल्या या वेब सीरिजमधून मुंबईची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहता आली. किंबहुना एका अनोख्या विश्वात घडणाऱ्या काही घडामोडींचं साक्षीदार होता आलं.
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे, जितेंद्र जोशी या कलाकारांच्या अभिनयामुळे 'सेक्रेड गेम्स' अधिक प्रभावी ठरली. गुन्हेगारी जगतातील अंतर्गत धागेदोरे आणि घडामोडींविषयीचे प्रसंग रंगवत उत्सुकता ताणून धरलेली ही वेब सीरिज एका अशा वळणावर संपली होती, जेथे प्रेक्षकांचे अनेक प्रश्न अनुत्तरीतच होते.
अनुत्तरीत प्रश्नांचीच उकल करण्यासाठी म्हणून या वेब सीरिजचं दुसरं पर्व १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाल आहे. नुकताच या नव्या पर्वाचा ट्रेलरही प्रसिद्ध करण्यात आला. पुन्हा एकदा 'गणेश गायतोंडे', 'सरताज', 'बंटी' ही पात्र समोर आली. अभिनेता पंकज त्रिपाठी, कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी यांनी साकारलेल्या भूमिकांची त्यांना जोड मिळाली.
'भाऊ... कहाँ हो आप?....', 'अपुन किधर था मालूम नही...', 'जंग का वक्त आ गया....' 'बलिदान देना होगा....', 'लाईफ हराम हो गई थी...', असे एकाहून एक संवाद ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले. याच आधारावर सोशल मीडियावर क्षणार्धाचाही विलंब न करता नेटकऱ्यांनी त्यांनी अफलातून कलात्मकता चाळवत काही मीम पोस्ट करण्याकस सुरुवात केली.
क्रिकेटच्या सामन्यापासून दैनंदिन जीवनापर्यंतचे अनेक संदर्भ देत हे भन्नाट मीम साकारण्यात आले. मग अगदी क्रिकेट विश्वचषकाचीही जोड त्यांना देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा माध्यमातून व्हायरल होणारे हे मीम पाहता 'सेक्रेड गेम्स २'च्या लोकप्रियतेचा आणि या पर्वाच्या उत्सुकतेचा सहज अंदाज लावता येत आहे.