चित्रपटातून उलगडणार मदर तेरेसा यांचा जीवनप्रवास
मदर तेरेसा यांच्या बायोपिकची तयारी सुरू
मुंबई : करुणा आणि शांतीच्या मार्गाचा अवलंब करत त्याच मार्गाने समाजाची मदत करणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका मदर तेरेसा यांच्या कार्याविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. आपलं संपूर्ण आयुष्यत गरजूंच्या मदतीसाठी वाहिलेल्या त्या एक देवदूत होत्या असं अनेकांचच म्हणणं आहे. अशा या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जीवनप्रवास आता एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवारीच त्याविषयीची घोषणा करण्यात आली. 'मदर तेरेसा - द सेंट' असं या चित्रपटाचं नाव असून, त्याचा फर्स्ट लूकही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला. ज्यामध्ये एका वयोवद्ध व्यक्तीचे जोडलेले हात दिलस असून, ते हात बरंच काही सांगून जात आहेत.
सीमा उपाध्यायने या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून त्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्वातील काही कलाकार झळकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रदीप शर्मा, नितीन मनमोहन, गिरीश जोहर आणि प्राची मनमोहन यांची या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. अतिशय महत्त्वाच्या अशाय या प्रोजेक्टची सुरुवात कोलकात्यात चॅरिटी मिशनरीच्या सध्याच्या सर्वेसर्वा सिस्टर प्रेमा मेरी पेरिक आणि सिस्टर लिन यांची भेट घेऊन करण्यात आली. उपाध्याय यांनीच याविषयीची माहिती दिली. मदर तेरेसा यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटाती निर्मिती करण्यासाठी निर्मातेही फार उत्साही असल्याचं आता स्पष्ट होत आहे. जागतिक स्तरावर खऱ्या अर्थाने एक आदर्श प्रस्थापित करणाऱ्या मदर तेरेसा यांच्या कार्याचा आढावा घेत साकारल्या जाणारा चित्रपट साकारताना त्यात कोणत्याही प्रकारची उणिव राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल असा निर्धार निर्मात्यांनी व्यक्त केला. तर, सर्वत्र शांती, प्रेम आणि दयेचा संदेश पोहोचवत या चित्रपटाच्या माध्यमातून आपण मदर तेरेसा यांच्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न करु अशी आशा निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
चित्रपटाच्या संहिता लेखनाचं काम आता जवळपास पूर्ण झालं असून, चित्रपटाच्या तांत्रिक आणि इतर बाबींवर लक्ष देण्यात येत आहे. यानंतर चित्रपटासाठीच्या कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. २०२० मध्ये हा महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका कोण साकारतं याकडे.