मुंबई : दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी – हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं, याच घराविषयी आणि घरातील नात्यांविषयी भाष्य करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि.यांची असून प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ता आहेत. हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात रिमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत.



रिमा यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रथम मराठी रंगभूमी व मराठी चित्रपटामधून काम करण्यास सुरुवात केली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेनेसर्वांचे  लक्ष वेधून घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. त्यांचे खरे नाव नयन भडभडे होते तर त्यांची आई मंदाकिनी भडभडे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका सर्वात जास्त केल्या आहेत. पण त्यांच्या सर्वच भूमिका जबरदस्त गाजल्या आहेत.


 ‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.