मुंबई : दाक्षिणात्य अभिनेते  चिरंजीवी  (Chiranjeevi) यांच्या नावाला फक्त दक्षिणेकडील कलाजगतातच नव्हे, तर संपूर्ण भारतात कमालीची लोकप्रियता मिळताना दिसते. काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आणि त्यांना तितकंच प्रेमही मिळालं. पण, आतापर्यंतच्या कारकिर्दीत चिरंजीवी यांना प्रत्येक वेळी चांगल्याच प्रसंगांना सामोरं जावं लागलं असं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 33 वर्षांनंतर हा प्रसंग समोर आला आहे, हा तोच क्षण होता जेव्हा चिरंजीवी यांना अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला होता. (Bollywood South indian cinema war )


नुकतंच आगामी चित्रपटाच्या निमित्तानं बोलताना त्यांनी 1989 मध्ये घडलेल्या त्या प्रसंगावर वक्तव्य केलं. हे सर्व त्यावेळी घडलं होतं, जेव्हा 'रुद्रवीणा' या चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 


भारतीय सिनेजगतात दाक्षिणात्य कलाजगताला स्थान मिळालं नाही? 
चिरंजीवी यांनी सांगितल्यानुसार त्यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन पंतप्रधानांनी चित्रपटविश्वातील दिग्गज व्यक्तींसाठी 'हाय टी'चं आयोजन केलं होतं. चिरंजीवीसुद्धा या कार्यक्रमात हजर होते. 


त्याचवेळी त्यांची नजर एका भींतीवर गेली जिथं भारतीय सिनेजगताच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला होता. तिथं पृथ्वीराज कपूर यांच्यापासून अमिताभ बच्चन यांच्याविषयी लिहिण्यात आलं होतं. पण, दाक्षिणात्य कलाविश्वातील कोणाचाही तिथं साधा उल्लेखही नव्हता. 


हा तोच क्षण होता, जेव्हा आपल्याला हीन वागणूक मिळाल्याची जाणीव चिरंजीवी यांतं मन पोखरत होती. हा एक अपमानच होता. हिंदी चित्रपटांनाच तिथं भारतीय चित्रपटांच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. तर, इतर चित्रपटांना स्थानिक चित्रपटांच्या विभागात स्थान देण्यात आलं होतं. त्यांचा काहीच मान नव्हता, असं चिरंजीवी यांनी स्पष्ट केलं. 


दाक्षिणात्य कलाजगतामध्ये मानाचं स्थान असणाऱ्या एका अभिनेत्यानं इतका मोठा उलगडा करणं, ही बाब किती गंभीर आहे याचाच विचार प्रस्थापितांनी करण्याची गरज आहे; नाही का ?