लॉस एंजेलिस : कलाविश्वात विशेषत: चित्रपट जगतात सध्या उत्सुकता लागलेली आहे ते म्हणजे ९१ व्या अकॅडमी पुरस्काराची अर्थात मानाच्या ऑस्करची. नामांकनांपासून ते अगदी ज्या ठिकाणी हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे त्या ठिकाणी व्यासपीठाची आखणी आणि सजावट कशी असणार आहे इथपर्यंत सर्वच बाबतीत आता तयारीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. ऑस्करचा हा थाट पाहता आता या पुरस्कार सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्याच स्टाईल स्टेटमेंडकडेही जगभरातील फॅशन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांपासून इतर सेलिब्रिटींच्याही नजरा लागलेल्या असतील. चला तर मग डोकावूया झगमगत्या ऑस्करच्या स्टायलिश दुनियेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॅशन, ड्रेसकोड आणि त्यातही आपलं वेगळेपण या निकषांच्या आधारे सेलिब्रिटी मंडळी ऑस्करसाठीच्या पेहरावाची निवड करतात. 'वोग ऑस्ट्रेलिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षी ऑस्करसाठी 'व्हाईट टाय' हा ड्रेस कोडचा महत्त्वाचा घटक असणार आहे. आतापर्यंतच्या ऑस्कर सोहळ्यांना हॉलिवूड सेलिब्रिटींनी काळ्या रंगाच्या अर्थातच 'ब्लॅक टाय फॉर्मल्स'ना प्राधान्य दिलं. दरवर्षीच्या काळ्या रंगांच्या टायला थोडं दूर लोटत यंदाचा हा ड्रेस कोड असल्याचं कळत आहे. महिलांसाठी ग्लिटरी गाऊन आणि पुरुषांसाठी टेलकोट, विंगटीप कॉलर आणि व्हाईट टाय असा एकंदर ड्रेस कोड असणार आहे. 


ड्रेसकोड काहीही असला तरीही पारंपरिक काळा टाय वापरण्यालाच काही कलाकार मंडळी आणि इतर आमंत्रित प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं जात आहे. यंदाच्या वर्षी ऑस्कर सोहळ्यामध्ये ऍमी ऍडम्स, एमा स्टोन, यालित्झा अप्रिसीओ, ग्लेन क्लोज यांच्या गाऊनकडे सर्वांच्याच नजरा असतील. त्याशिवाय 'अ स्टार इज बॉर्न'फेम लेडी गागा ही नेमकी रेड कार्पेटवर कोणत्या रुपात येणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. तेव्हा आता रेड कार्पेटवर कलाकारांची ही मांदियाळी कधी एकदा अवतरते आणि कोणत्या फॅशन डिझायनरच्या डिझाईन्सना जागतिक स्तरावर पसंती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.