Oscar Nominations 2023: अकादमी पुरस्कार सोहळा म्हणजेच 95 व्या ऑस्कर्स पुरस्कार (95th Academy Awards) सोहळ्याची अंतिम नामांकनं जाहीर झाली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एसएस राजमौलींच्या (SS Rajamouli) 'आरआरआर' (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्यालाही नामांकन मिळालं आहे. या गाण्याला सर्वोत्तम मूळ गाणं (ओरिजनल स्कोअर) (Best Original Song) या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. एमएम कीरावानी हे या गाण्याचे संगीतकार आहेत. या गाण्याला केवळ नामांकनं मिळालं नसून गोल्डन ग्लोब्समधील सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार मिळवणारं हे गाणं ऑस्कर पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे.


भारतासाठी फार मोठा दिवस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ऑस्कर्स पुरस्कार 2023 च्या नामांकनांची घोषणा कॅलिफॉर्नियामधील बवर्ली हिल्स येथे करण्यात आली. या नामांकन सोहळ्यामधील होस्ट रिज अहमद आणि अभिनेत्री एलीसन विलियम्सने भारतीय चित्रपटासाठी आज फार मोठा दिवस आहे असं सांगत गाण्याची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असल्याचं सांगितलं. मागील महिन्यामध्येच 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्तम मूळ गाणं (ओरिजनल स्कोअर) कॅटेगरीत 'ऑस्कर' (Oscars) म्हणजेच अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठीही शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं. या गाण्यावर होत असलेला कौतुकाचा वर्षाव, नुकताच मिळालेला 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार आणि आता 'ऑस्कर'मधील नामांकनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं नक्कीच ऑस्कर्स जिंकेल असा विश्वास भारतीय चाहत्यांना वाटत आहे.


कधी आहे ऑस्कर्सचा मुख्य सोहळा?


13 मार्च 2023 रोजी ऑस्कर्सचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे.



'गोल्डन ग्लोब्स 2023' यापूर्वीच जिंकला


अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये याच महिन्याच्या सुरुवातीला पार पडलेल्या ८० व्या 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार सोहळ्यात (golden globes 2023 award) एसएस राजमौलींच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग-मोशन पिक्चर' कॅटेगरीमधील पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली होती. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि न्युनिअर एनटीआरवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याने 'गोल्डन ग्लोब्स' पुरस्कार सोहळ्यात अनेक आंतरराष्ट्रीय गायक आणि गितकारांना धोबपछाड देत पुरस्कारावर नाव कोरलं होतं. टेलर स्विफ्टचं 'कॅरोलिना', ग्रेगोरी मानचं 'चाओ पापा', लेडी गागाचं 'होल्ड माय हॅण्ड'बरोबरच 'ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर' चित्रपटातील 'लिफ्ट मी अप' सारख्या गाण्यांशी स्पर्धा असताना या गाण्याने पुरस्कार पटकावला होता.