मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. बुधावारी दुपारी ३.३० वाजता मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत 'पद्मश्री दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांनी नेहमीच इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ते अतिशय खास आहेत. त्यांच्या बहुरंगी अभिनयाने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवले. नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन अशा सर्वच माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या निधनाचे अतिशय दुख: असल्याचे' त्यांनी म्हटले आहे. 



दिन्यार यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत त्यांनी रोशन सिंह सोडीच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. 'तेरी भी चूप मेरी भी चूप', 'कभी इधर कभी उधर', 'दम दमा दम', 'हम सब एक है', 'दो और दो पांच', 'दिल विल प्यार प्यार', 'शुभ मंगल सावधान', 'करिश्मा: एक मेरिकल डेस्टनी', 'हम सब बाराती', 'खिचडी' यांसारख्या शोमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या. 


दिन्यार कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या खळखळून हसवणाऱ्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत होती. कलाविश्वात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


दिन्यार यांनी टेलिव्हिजनवरील मालिकांसह चित्रपटातही काम केले. 'चोरी चोरी चुपके चुपके', 'खिलाडी', 'बादशाह', 'दरार', '३६ चाइना टाउन' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवले. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी गुजराती मालिकांमध्येही काम केले आहे. 


दिन्यार यांच्या जाण्याने हिंदी कलाविश्वातील 'कॉमेडी किंग' हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वातून दुख: व्यक्त केले आहे.