जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : घुमर.... घुमर.....गेल्या कित्येक दिवसांपासून घुमत असलेलं हे गाणं अखेर पद्मावतमध्ये आहे...फक्त दीपिकाची दिसणारी कंबर ग्राफिक्स आणि कलर करेक्शनच्या मदतीनं लपवण्यात आलीय...अल्लाऊद्दीन खिल्जी आणि राजा रतनसिहांना आयुष्यात जेवढ्या संकटांचा सामना करावा लागला नसेल, तेवढी संकटं झेलत अखेर पद्मावत प्रदर्शित झालाय...


काय आहे कथा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीच्या डिस्क्लेमरमध्येच हा सिनेमा काल्पनिक आहे आणि सती परंपरेला प्रोत्साहन देणारा नाही, हे स्पष्ट करण्यात आलंय.. मुहम्मद जयासी यांच्या कवितेवर आधारित हा पद्मावत सिनेमा आहे... संजय लीला भन्साळी या नावाला साजेसा असाच भव्यदिव्य सिनेमाचा लूक आहे.... राणी पद्मावती राजा रतनसिंहांच्या प्रेमात पडते, अल्लाऊद्दीन खिलजीची चितोडवर नजर पडते... पद्मावतीचं सौंदर्य आणि शौर्याच्या गोष्टी ऐकलेला अल्लाऊद्दीन चितोडवर चाल करुन येतो आणि मग युद्ध.... अशी या पदमावतची साधारण कथा....


कसा आहे सिनेमा?


पद्मावतमध्ये बहुतांश दृश्यांमधून राजपूत रणनितीचं, त्यांच्या शौर्याचं उत्तम दर्शन घडतं. सिनेमात राजपूत आणि खिलजींमधल्या युद्धातलं प्रत्येक दृश्य उत्कंठा वाढवणारं आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे संवाद तोडीस तोड आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुद्दयांवर करणी सेनेचा या सिनेमाला विरोध होता, असा एकही मुद्दा किंवा एकही दृश्य सिनेमात नाही. अख्ख्या सिनेमाभर अल्लाउद्धीन खिलजी आणि राणी पद्मावतीमध्ये एकही संवाद किंवा दोघांचं एकही एकत्र दृश्य नाही. अल्लाऊद्दीन आणि पद्मावतीचं एखादं स्वप्नातलं गाणंही या सिनेमात नाही. राणी पद्मावतीच्या ऐतिहासिक प्रतिमेच्या चौकटीला कुठेही धक्का लावलेला नाही. खरं तर संपूर्ण सिनेमा हा राजपूत की आन, बान आणि शान असाच आहे.


कलाकारांची जबदस्त कामं


राजा रतनसिंहाच्या भूमिकेत असलेला शाहीद ठीकठाक...भाव खावून गेलाय तो अल्लाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत असलेला रणवीर सिंग...गोची झालीय ती दीपिकाची...खूप सा-या कटसमध्ये दीपिकाची भूमिकाच कमी झाल्यासारखी वाटतेय... त्यामुळे पदमावतीच्या चौकटीत राहणं, यापलीकडे दीपिका काही करु शकली नाही...


एकंदर काय...


एकंदरीत थोडासा इतिहास, त्यापेक्षा जास्त रंजन, त्याला भव्यदिव्य सेटसची जोड असा टिपिकल भन्साळी सिनेमा आहे. आता पद्मावती ते पदमावत या प्रवासात सिनेमाचं नुकसान झालं की सिनेमाची पब्लिसिटी झाली हे भन्साळींनाच माहीत. पण अखेर पद्मावत प्रदर्शित झालाय..


झी २४ तास रेटींग : ३ स्टार