मुंबई : पद्मावती चित्रपटाबद्दल लोकांच्या मनातील संताप अधिकाधिक वाढत आहे. उत्तर प्रदेश सरकारने सेन्सर बोर्डला विनंती केली आहे की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोकांच्या भावनांचा विचार करा. यातच एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे मेरठ येथील एका राजपूत नेत्याने संजय लीला भन्साळीविरुद्ध  एक फर्मान काढले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात असे म्हटले आहे की, "भन्साळींचे शीर कापून आणल्यास त्याला ५ कोटींचे बक्षीस देण्यात येईल. इतकंच नाही तर करणी सेनेचे लोकेन्द्र सिंग यांनी सांगितले की, १ डिसेंबरला पद्मावती प्रदर्शित झाल्यास राजपूत संघटना भारत बंदचे आयोजन करेल. प्रदर्शना दिवशी आम्ही देशभरात मोर्चे काढू."


विरोधकांचे असे म्हणणे आहे की, भन्साळी यांनी राजपुतांची महाराणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण चित्रपटात केले आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी देशातील विविध भागात भन्साळींविरुद्ध हिंसेचे आणि विरोधाचे वातावरण असेल. या सर्व संतप्त वातावरणाचा भन्साळी त्यांच्या विशिष्ट्य शैलीत सामना करत आहेत. 


राजस्थान राज्य महिलाआयोगाच्या प्रमुख सुमन शर्मा यांनी सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी यांना पत्र लिहून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असे काही होऊ देऊ नका, अशी विनंती केली आहे. तसेच शर्मा यांनी राजपूत समुदायाला चित्रपटाच्या पूर्व स्क्रीनिंगमध्ये सहभागी करण्याची मागणी केली आहे. 


भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे राजस्थानाचे प्रमुख अशोक परनामी यांनी मीडियाला सांगितले की, ऐतिहासिक तथ्यांना मुरड घातल्यास वसुंधरा राजे सरकार हे सहन करणार नाही. तर छत्तीसगडचे राजवाडे  दिलीप सिंह जुदेव यांची सून  हिना सिंह जुदेव यांनी देखील चित्रपटातील पद्मावतीच्या चुकीच्या चित्रीकरणाबद्दल असंतोष व्यक्त केला आहे. चित्रपटातील घुमर गाण्याबद्दल त्या म्हणाल्या की, "राजपुतांची महाराणी कधीच कोणासमोर नाचली नव्हती, याला इतिहास साक्षी आहे. त्यामुळे तुम्ही इतिहासाचा खेळ करू शकत नाही." यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता.