मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आधी हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र चित्रपटाचे काही काम बाकी असल्यामुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक गोष्ट समोर येते आहे. ती म्हणजे अशी की पद्मावती चित्रपटाचा फर्स्ट लूक या नवरात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि भन्साली प्रॉडक्शन्सच्या पद्मावती चित्रपटाचे पहिले पोस्टर २१ सप्टेंबरला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाँच करण्यात येणार असल्याचे समजतंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भन्साळींच्या पद्मावती चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. आणि ही उत्सुकता अधिक न ताणता घटस्थापनेच्या दिवशी भन्सालींच्या राणी पद्मावतीचे रूप सर्वांसमोर येणार आहे. पद्मावती चित्रपट भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या कर्तृत्वाचं प्रतिक आहे. त्यामुळे नवरात्रीला देवीच्या स्थापनेच्या शुभ प्रसंगी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज होणार आहे.  


पद्मावती चित्रपटात आजपर्यंत कधीही न अनुभवलेली दृश्यात्मक अभिव्यक्ती पाहायला मिळणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव हे पद्मावतीचे वैशिष्ट्य असेल. संजय लीला भन्साली याविषयी सांगतात, “राणी पद्मावतीची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या चित्रपटाचा फर्स्टलूक घेऊन आम्ही येतोय आणि नवरात्रौत्सव साजरा करतोय.”


यात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. या चित्रपटासाठी शाहिदने सहा प्रकारच्या तलावरबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटासाठी दीपिका आणि शाहिदला ११ कोटी तर रणवीर सिंगला १३ कोटींचे मानधन देण्यात आले आहे.