मुंबई : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी पुन्हा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेता संजय दत्त आणि अर्जुन कपूर स्टारर 'पानिपत' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. फवाद चौधरींनी 'पानिपत' चित्रपटावर प्रश्न उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चित्रपटामध्ये मुसलमान शासकांना क्रूर दाखवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखाली आक्षेपार्ह कथा लिहिणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार.' असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. 


त्याचप्रमाणे ४ नोव्हेंबर रोजी संजय दत्तचा पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राजदूत डॉ. शैदा अब्दाली यांनी देखील चिंता व्यक्त केली होती. अफगाणिस्तान नंतर आता पाकिस्तानने 'पानिपत' चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. 


'पानिपत' चित्रपटात संजय अहमद शाह अब्दालींच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. ६ डिसेंबरला हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.