नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सर आजारावर इलाज करत आहेत. त्यांचे कुटुंबिय तसंच मित्र-परिवार त्यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला जात असतात. शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट, विक्की कौशल आणि सिनेसृष्टीतील इतर अनेक कलाकारांनी ऋषी कपूर आणि नितू कपूर यांना भेट दिली. आता पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन त्यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला पोहचली. ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर यांच्या एका चाहतीने या दोघी कोण आहेत? असा सवाल केला होता. त्यावर 'ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मावरा होकेन आणि तिची मैत्रिण खातिजा' अशा कॅप्शनसह ऋषी कपूर यांनी फोटो शेअर केला आहे. ऋषी कपूर यांच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. 



मावरा होकेनने २०१६ मध्ये आलेल्या 'सनम तेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने सरस्वती ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने अभिनेता हर्षवर्धन राणेसह स्क्रिन शेअर केली होती. 


गेल्या वर्षी ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नीतू कपूर आणि ऋषी कपूर उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले. ऋषी कपूर आता कॅन्सरमुक्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. 


मावरा होकेन अभिनेता रणबीर कपूरची चाहती असल्याचं तिने अनेकदा मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे.