`त्यानं मला बेंचवर बसायला सांगितलं आणि...` पंकज त्रिपाठींनी बड्या दिग्दर्शकाबाबत केला गौप्यस्फोट
Entertainment News : हिंदी चित्रपट जगतामध्ये कास्टिंगच्या प्रक्रियेमध्ये येणारे अनेक चित्र विचित्र अनुभव आजवर उघडकीस आले आहेत. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीसुद्धा असाच एक अनुभव सांगितला.
Entertainment News : कलाजगतामध्ये नावारुपास येण्यापूर्वी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अनेक दिग्दर्शकांकडे कामाच्या निमित्तानं विचारणा केली होती. त्यातलंच एक नाव होतं, 'सत्या' फेम दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. मुंबईत स्वप्नपूर्तीसाठी आलेल्या या अभिनेत्यानं राम गोपाल वर्माची भेट घेतली आणि त्या भेटीत त्याला अनपेक्षित अनुभव आला. Aap Ki Adalat या मुलाखतपर कार्यक्रमादरम्यान पंकज त्रिपाठी यांनी त्या भेटीवरून पडदा उचलला आणि काही गौप्यस्फोट केले.
राम गोपाल वर्मा यांची भेट आणि...
आरजीवी यांच्या भेटीविषयी सांगताना (Pankaj Tripathi) त्रिपाठी म्हणाले, 'मी एकदा त्यांच्या (राम गोपाल वर्मा) ऑफिसला गेलो. त्यावेळी तिथं माझ्याआधीच कोणीतरी भयावह चेहऱ्याची व्यक्ती पोहोचली होती. तिथं मला माझाच चेहरा जरा बरा वाटत होता कारण इतरांच्या नाकावर खुणा, चेहऱ्यावर व्रण वगैरे होते. मी त्यांना विचारलं ते अभिनेते आहेत का, यावर मला होकारार्थी उत्तर मिळालं. तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्ही असे भयावह का दिसताय? त्यावर राम गोपाल वर्मा अशाच धडकी भरवणाऱ्या माणसांची निवड करतो, असं उत्तर त्यांनी दिलं'.
पुढे या दिग्दर्शकाला प्रत्यक्ष भेटण्याच्या विचित्र अनुभवावरूनही त्यांनी पडदा उचलला. 'तो प्रसंग तर कमालच होता. कारण त्यानंतर रामूनं मला फोन केला होता. त्यानं मला बेंचवर बसायला सांगितलं, ज्यावर चार माणसं बसू शकतील. त्यानं मला एका बाजूला बसायला सांगितलं जणूकाही त्या रिकाम्या जागेत इतर माणसं बसणार आहेत. तो तिथं समोर बसला आणि मला पाहू लागला', असं त्रिपाठींनी सांगितलं.
हेसुद्धा वाचा : Indian Railway Secrets : 'या' ठिकाणहून जाताच ट्रेनच्या लाईट रहस्यमयीरित्या बंद होतात; काय आहे कारण?
आपल्याकडे सलग 10-15 मिनिटांसाठी कोणीतरी पाहत असेल तर संकोचल्यासारखं वाटेलच आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतही तेच घडल्याचं त्यांनी सांगितलं. कारण नेमकं कुठं पाहायचं हे त्यांना कळेना. पुढच्या क्षणी वर्मानं त्यांना जायला सांगितलं आणि पुन्हा कधीच फोन केला नाही. त्यानंतर जेव्हाजेव्हा ते दोघंएकमेकांसमोर आले तेव्हातेव्हा त्यांच्यात कोणताही संकोचलेपणा नव्हता. तर, त्यांनी एकमेकांच्या कामाची प्रशंसाच केली. याचविषयी सांगताना त्रिपाठी म्हणतात, 'ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. पण, त्यांनी मला तेव्हा चित्रपटासाठी निवडलं असतं तर त्यांचंही नुकसान झालं असतं आणि त्यांचंही.'