`त्या` ट्विटमुळे परिणीति चोप्राची ब्रँड ऍम्बेसेडर पदावरून उचलबांगडी
सरकारविरोधात ट्विट करणं कलाकारांना भोवलं
मुंबई : देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. जामिया विद्यापीठापासून सुरू झालेलं हे आंदोलन आता सर्वच शिक्षणसंस्थांपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीसह मुंबई, बंगलुरू, लखनऊपर्यंत पोहोचलेल्या या आंदोलनात आता बॉलिवूड कलाकारांनी सोशल नेटवर्किंगवरून सहभाग घेतला आहे. या कायद्याला विरोध करणारे ट्विट अभिनेत्री परिणीति चोप्राने देखील केलं होतं. आणि हेच ट्विट तिला भोवल्याचं समोर आलं आहे.
परिणीति चोप्राची हरयाणा सरकार केंद्रांने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेची ब्रँड ऍम्बेसेडर पदावर निवड केली होती. मात्र केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ट्विट करणं तिला भोवलं आहे. ट्विट करून कायद्याला विरोध केल्यानंतर तिची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. (नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात स्वराची घोषणाबाजी; 'संघवाद पे हल्लाबोल...')
त्याचप्रमाणे अभिनेता सुशांत सिंहने मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे त्याला 'सावधान इंडिया' कार्यक्रमातून वगळण्यात आलं आहे. यासंदर्भात सुशांत म्हणतो की,'मी ज्या दिवशी आंदोलनात सहभागी झालो त्याच दिवशी करार रद्द होणे, हा योगायोग असू शकते. चॅनलकडे सुत्रसंचालक बदलण्याचा हक्क आहे.' (प्रियंका चोप्राचा CAA ला कडाडून विरोध)
परिणीति चोप्राने देखील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेला BARBARIC असं संबोधलं आहे. परिणीति ट्विटरवर म्हणते की,'जर एखाद्या मुद्यावर आवाज उठवला तर असे हाल होणार असतील. मग CAA तर विसरूनच जा. एक विधेयक पास करण्यासाठी आपल्याला भारताला लोकशाही देश म्हणणं विसरून जायला हवं. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यावर निर्दोष लोकांना मारलं जात आहे.'