१० महिन्यांपासून कोमात आहे हा अभिनेता
सिनेमांत कॉमेडी कॅरेक्टर प्ले करणारे अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. असाच एक कॉमेडी अभिनेता नीरज वोरा गेल्या १० महिन्यांपासून कोमात आहे.
मुंबई : सिनेमांत कॉमेडी कॅरेक्टर प्ले करणारे अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. असाच एक कॉमेडी अभिनेता नीरज वोरा गेल्या १० महिन्यांपासून कोमात आहे.
१९ ऑक्टोबर २०१६ मध्ये आलेल्या ब्रेन स्ट्रोकमुळे नीरजला दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल केलं आहे. पहिलं त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र त्याची तब्बेत सुधारल्यानंतर त्याला मार्च २०१७ मध्ये मुंबईत दाखल करण्यात आलं. तेव्हापासून नीरज आपला मित्र फिरोज नाडियाडवाला याच्याकडे राहत आहे. सध्या नीरज आपल्या मित्रासोबत त्याच्या घरी म्हणजे जुहूतील 'बरकत विला' मध्ये राहत आहे. या घरातील एक खोली आयसीयुमध्ये कन्वर्ट करून देण्यात आली आहे. फिरोजने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०१७ पासून नीरजसोबत चोवीस तास एक नर्स, वॉर्ड बॉय आणि एक कुक असतो. त्यासोबतच फिजियोथेरेपिस्ट, न्यूरो सर्जन, एक्यूपंक्चर थेरेपिस्ट आणि जनरल फिजिशियन प्रत्येक आठवड्याला विझिट करतात.
नीरज आता एकटाच आहे....
नीरजच्या कुटुंबातील सर्व लोकांचे निधन झाले आहे. नीरजची पत्नी या अगोदरच सोडून गेली आहे. तर त्याला कुणीही संतान नाही. तसेच कुटुंबात फक्त आई होती तिचे निधन देखील २०१४ साली झाली. नीरजच्या मागे-पुढे कुणी नाही म्हणून मित्र फिरोज त्याची काळजी घेतो.
सिनेमांच्या पोस्टरने सजवली आहे रूम
नीरज सध्या ज्या खोलीत राहत आहे ती खोली त्याच्याच अनेक सिनेमांच्या पोस्टरने सजवली आहे. यामध्ये रंगीला, हेराफेरी, फिर हेराफेरी, गोलमाल, दौड़ आणि खिलाड़ी 420 च्या पोस्टर्सने सजवलं आहे. तसेच रूममध्ये टिव्ही देखील आहे. आणि त्या टिव्हीवर त्याच्या आवडीचे सिनेमे लावले जातात. जेणे करून तो लवकर बरा होईल.
गेल्या ५ महिन्यापासून नीरजच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र आता ही तो कोमातच आहे. ऑडिओ थेरेपीद्वारे त्याच्यावर उपचार केले जात आहे. नीरजला त्याचे वडिल पंडित विनायक राय वोरा यांचं संगीत ऐकवलं जातं. आणि तो त्याला प्रतिक्रिया देखील देतो.
आजारी पडण्याअगोदर नीरज म्हणजे ऑक्टोबर २०१६ रोजी ब्रेन स्ट्रोक झालं तेव्हा तो हेरा फेरी ३ या सिनेमाचं काम करत होता. आणि या सिनेमाला फिरोजही प्रोड्यूस करत होते. सिनेमाची स्क्रिप्ट फायनल होऊन डिसेंबर २०१६ रोजी शुटींग देखील सुरू होतं.