ड्रेसबद्दलच्या `संस्कारी` सल्ल्यांना प्रियांकाचं प्रेमळ प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची बर्लिनमध्ये अचानक भेट झाली... आणि या भेटीदरम्यान प्रियांकानं परिधान केलेल्या ड्रेसवरून तिच्यावर सोशल मीडियावर टीकाही झाली. या टीकेला प्रियांकानं एक प्रेमळ प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची बर्लिनमध्ये अचानक भेट झाली... आणि या भेटीदरम्यान प्रियांकानं परिधान केलेल्या ड्रेसवरून तिच्यावर सोशल मीडियावर टीकाही झाली. या टीकेला प्रियांकानं एक प्रेमळ प्रत्युत्तर दिलंय.
प्रियांकानं ट्विटरवर पंतप्रधानांसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला १८ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले... तर इन्स्टाग्रामवरही या फोटोला ६.८ लाख लाईक्स मिळाले.
प्रियांकाच्या ड्रेसवरून आणि उघड्या पायांवरून अनेकांनी या फोटोवर टीकाही केलीय. 'पंतप्रधानांसमोर बसण्याची शिस्त नाही, लाज वाटायला हवी' ते 'ही पीएमसमोर पीएससारखी बसलीय' पर्यंत अनेक कमेंट्स या फोटोवर मिळाल्या.
तर अनेकांनी टीका करणाऱ्यांनाच धारेवर धरत प्रियांकाला पाठिंबा दर्शवला. श्वेता हिनं 'प्रियांकाच्या ड्रेसवर हा वाद का? ती आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतेय... यामध्ये छोट्या कपड्यांचा मुद्दा येतोच कुठे. भारत कधीही विकास करू शकत नाही. महिलांना कधीही बरोबरीचा दर्जा मिळू शकत नाही' असं म्हटलंय. तर 'पायांना लैंगिक मुद्दा बनवणं योग्य आहे का?' असाही प्रश्न एका युझरनं विचारलाय.
यानंतर प्रियांकानं आपल्या आईसोबत आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यात ती लिहिते 'आजच्या दिवसासाठी केवळ पाय पाहा... हे आमच्या जीन्समध्ये आहे'. या फोटोत प्रियांका आणि तिची आई मधू चोप्रा या दोघीचेही पाय दिसत आहेत.
ट्रोलवर गोंधळून न जाता प्रियांकानं तिच्यावर टीका करणाऱ्यांना प्रेमळ प्रत्यूत्तर दिलंय. त्यामुळे तिचं सोशल मीडियावर कौतुकही होतंय.