मुंबई : अनेक वाद-विवादानंतर अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट प्रदर्शित झाला. २४ मे रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने २.५० कोटींचा आकडा पार केला आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देशभरातील जनतेने मोदींनाच पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. देशभरातून मोदींच्याच नावाची चर्चा असताना चित्रपटाला मात्र याचा फायदा होताना दिसत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी 'पीएम नरेंद्र मोदी'ने पहिल्या दिवशी २.८८ कोटींची कमाई केल्याचं म्हटलंय. चित्रपटाच्या सकाळच्या शोसाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होता. परंतु संध्याकाळनंतर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 



ओमंग कुमार दिग्दर्शित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींची प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या अनेक तारख्या बदलण्यात आल्या. चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याबाबत सांगण्यात आले होते. याचिकेत निवडणुकीदरम्यान चित्रपट प्रदर्शित केल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याने निवडणूक काळात 'पीएम नरेंद्र मोदी' प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. परंतु २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अखेर २४ मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.