दिग्दर्शक : ओमंग कुमार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माते : संदीप सिंह, सुरेश ओबेरॉय


मुख्य भूमिका : विवेक ओबेरॉय


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सर्वत्र मोदींच्याच नावाची चर्चा असताना आता नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने प्रमुख भूमिका साकारली आहे. 'मेरी कॉम' आणि 'सरबजीत' यांसारखे उत्तम बायोपिक करणाऱ्या ओमंग कुमार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. परंतु इतर बायोपिकप्रमाणे ओमंग कुमार 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकमध्ये काही खास कमाल करु शकले नाहीत. अभिनयापासून चित्रपटातील पात्र, लेखन, दिग्दर्शन, सिन्समध्ये कमरता दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आणि काही वादही होते. चित्रपटात या दोघांचं संतुलन राखण्यात यश आलं नाही. परंतु विवेक ओबेरॉयची भूमिका, इतर पात्र या जमेच्या बाजू म्हणता येतील.


चित्रपटात मोदींच्या चहा विकण्यापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा शेवट २०१४ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथ घेण्यावर करण्यात आला आहे.


विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदी यांची भूमिका चांगली साकारली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पीएम मोदी यांच्या रॅली, सभा आणि पंतप्रधान बनण्याआधीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यावेळी पीएम मोदी यांच्या भाषणाची शैली विवेक ओबेरॉयने उत्तम पकडली आहे. त्याने मोदींच्या अंदाजात भाषण दिलं आहे. हा भाग चित्रपटाला वर नेण्यास यशस्वी ठरतो. चित्रपटातील विवेकचा लुकही चित्रपटाची जमेची बाजू ठरत आहे. 


चित्रपटातील कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला असला तरी संवाद मात्र फार ठळक वाटत नाहीत. मोदींचं संवादकौशल्य जितकं प्रभावी आहे तितके चित्रपटातील संवाद प्रभावी वाटत नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या खऱ्या आयुष्याप्रमाणे या पात्रांना न्याय देण्यात आलेला नाही. चित्रपटातील इतर पात्रांना स्क्रिनवर अधिक काळ दाखवण्यात आलं नसल्याचंही दिसतं. मधेच चित्रपटात काही सिन्स जबरदस्तीने टाकल्यासारखे वाटत आहेत. 


जर तुम्ही मोदींचे चाहते असाल तर चित्रपट नक्की पसंतीस पडू शकतो. पंतप्रधान मोदी यांचं आयुष्य आणि त्यांच्या जीवनात आलेल्या चढ-उताराबाबत जाणून घेण्याची इच्छा असल्यास हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की जाऊ शकतात. परंतु जर तुम्ही चांगल्या, दर्जेदार कटेंटचा विचार करत असाल तर मात्र तुमची निराशा होऊ शकते.