नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये सिनेमा संग्रहालयाचे उदघाटन केले. या कार्यक्रमासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आवर्जून उपस्थित होते. याच कार्यक्रमावेळी इम्तियाज अली याने घेतलेला एका फोटो आणि त्यावर खुद्द नरेंद्र मोदी यांनी केलेली टिप्पणी सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. मिश्किल शब्दांत नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी करीत सेल्फीतील इम्तियाज अली आणि त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमा संग्रहालयाच्या उदघाटनानंतर तिथे उपस्थित असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वच दिग्गज कलाकारांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी मोदींसोबत सेल्फी काढण्यासाठीही कलाकार आणि दिग्दर्शकांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. आपल्या सिनेमांमध्ये वेगळी वाट चोखाळणाऱ्या इम्तियाज अलीने नरेंद्र मोदी पाठमोरे दिसत असताना एक सेल्फी घेतला. या सेल्फीमध्ये त्याच्यासोबत कार्तिक आर्यन आणि करण जोहर दिसताहेत. इम्तियाजने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केल्यावर लगेचच कार्तिकने तो त्याच्या ट्विटवर हॅंडलवर शेअर केला. इथपर्यंत सगळं सुरळीत सुरू होते. पण जेव्हा या सेल्फीच्या ट्विटला खुद्द नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केले. त्यावेळी सगळ्यांचेच लक्ष त्या सेल्फीकडे गेले. रिट्विट करताना नरेंद्र मोदी यांनी केलेली टिप्पणी अत्यंत मिश्लिक आणि खुमासदार ठरली.



सेल्फी ट्विट करताना कार्तिक आर्यन याने Losers backfie with the Honorable PM! असे म्हटले होते. त्याला रिट्विट करताना नरेंद्र मोदी यांनी Not losers but Rockstars! No selfie Jab We Met but there will always be another occasion. असे उत्तर दिले. पंतप्रधानांसोबत सेल्फी घेता आला नाही म्हणून कार्तिक आर्यनने इम्तियाजने घेतलेल्या सेल्फीला बॅकफी असे म्हटले होते. पण इम्तियाज अलीच्या 'जब वी मेट' या सिनेमाच्या नावाचा धागा पकडून आता जरी माझ्यासोबत सेल्फी घेता आला नसला, तरी भविष्यात संधी नक्कीच मिळेल, असे म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या अकाऊंटवरून केलेल्या रिट्विटला अनेक नेटिझन्सनी प्रतिसाद दिला. त्यामुळे थोड्याच वेळात हे ट्विट सोशल मीडियामध्ये एकदम व्हायरल झाले.



सिनेमा संग्रहालयाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी केलेल्या बहुतांश ट्विटला नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. काही दिवसांपूर्वीच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी, दिग्दर्शकांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी चित्रसृष्टीला सध्या भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर चर्चाही झाली होती.