मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी हटके भूमिका साकारत असतो. एक्सपेरिमेंटल अभिनेता म्हणून आयुष्मान खुरानाला ओळखलं जातं. नुकतंच त्याने कानपूरमध्ये त्याच्या आगामी 'बाला' चित्रपटाचं शूटिंग सुरु केलं आहे. परंतु हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. मार्च महिन्यामध्ये कमलकांत चंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आयुष्मान खुराना, दिग्दर्शक अमर कौशिक आणि चित्रपट निर्माते दिनेश विजान यांच्या विरोधात चित्रपटाची कथा चोरी केल्याचा आरोप लावत तक्रार दाखल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा कमलकांत यांनी न्यायालयाच्या निर्णयाआधी चित्रपटाचं शूटिंग सुरु केल्याबाबत आयुष्मान आणि चित्रपट निर्मात्यांवर कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०६ (विश्वासघात) अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कमलकांत यांनी आरोप लावले आहेत की, शेवटची सुनावणी १९ एप्रिल रोजी झाली होती. या दरम्यान आयुष्मान आणि त्याच्या टीमच्या वकिलांनी चित्रपटाचं अद्याप स्क्रिप्टिंग सुरु असल्याची चुकीची माहिती दिली.


आयुष्मानने ६ मे रोजी चित्रपटाचं शूटिंग सुरु झाल्याचं ट्विट केलं होतं. 'न्यायालयाच्या निर्णयाआधी शूटिंग सुरु करणं चुकीचं आहे. त्यांनी शेवटच्या सुनावणीवेळी स्क्रिप्टवर अजून काम सुरु असल्याचं सांगितलं होतं. आता १५ दिवसांतच त्यांनी शूटिंगला सुरुवात कशी केली? म्हणजेच त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली' असल्याचं त्यांनी म्हटलंय. 



कमलकांत चंद्रा यांनी त्यांना पुढील सुनावणीची तारिख १० जून दिल्याचं सांगितलं आहे. या दरम्यान त्यांनी चित्रपटाचा मोठा भाग शूट केला गेला असेल असंही त्यांनी म्हटलंय. 


या प्रकरणी आयुष्मानच्या टीमने 'प्रकरण न्यायालयात असल्याने आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. आमची स्क्रिप्ट मूळ, खरी आहे आणि आम्ही ती न्यायालयात सादर करु' असं म्हटलं आहे.


त्यामुळे आता 'बाला' चित्रपटाचा वाद कधी संपणार आणि कायदेशीररित्या चित्रपटासाठी काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.