मुंबई : कायमच चर्चांची वर्तुळं आणि वादाच्या भोवऱ्याच अडकणारी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यापुढे पुन्हा एकदा काही अडचणी उभ्या राहिल्याचं पाहायला मिळत आहे. अनुक एका समुदायातील व्यक्तींचा उल्लेख दहशतवादी म्हणून केल्याबद्दल तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहीण रंगोली चंदेल हिला पाठिंबा देत तिचं समर्थन करण्यासाठी म्हणून एका व्हिडिओमध्ये तिने हे वक्तव्य केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. बुधवारी, आंबोली पोलीस स्थानकात वकील अली काशिफ खान देशमुख यांनी ही तक्रार दाखल केली. ज्यानंतर कंगनाच्या अडचणींमध्ये भर पडल्याचं पाहायला मिळालं.


कंगनाची बहीण आणि तिची व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी रंगोली चंदेल हिच्या ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी कारवाई करत ते सप्सेंड करण्यात आलं होतं. भडकाऊ  वक्तव्य केल्यामुळे तिच्या अकाऊंटवर ही कारवाई करण्यात आली होती.


तक्रारीत दाखल केल्यानुसार बहिणीला पाठिंबा देत कंगनाने एका व्हिडिओमध्ये अमुक एका समुदायाचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला होता. काही काळापूर्वी तिने हा व्हिडिओ सर्वांच्या भेटीला आणला होता. जो प्रदर्शित झाल्यानंतर देशमुख यांनी आंबोली पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल केला. ज्यामध्ये त्यांनी कंगनाविरोधातील तक्रारीची मागणी केली होती. तेव्हा आता या परिस्थितीमधून कंगना नेमकी कशी बाहेर पडणार की हा वाद आणखी पेटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.