मुंबई : सध्या देशात एककीडे लोकसभा निवडणूक २०१९ चं वारं वाहू लागलंय... तर दुसरीकडे बॉलिवूडमध्येही राजकीय सिनेमांचं आणि राजकीय व्यक्तींच्या चरित्रपटांचं पिक आलंय. निवडणुकीपूर्वी देशात 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक', 'द एक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर', 'ठाकरे', 'द ताश्कंद फाईल्स' यांसारखे अनेक देशभक्तीवर आधारित सिनेमे मोठ्या पडद्यावर एकापाठोपाठ येऊन आदळत आहेत. याच विषयावर बोलताना, राजकीय सिनेमा आणि निवडणूक निकालांचा संबंध नाही असं सिनेनिर्माते प्रकाश झा यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना केंद्रबिंदू ठेवून आलेल्या 'द एक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' हा सिनेमा गांधी कुटुंबाची प्रतिमा खराब करण्याचा एक प्रयत्न असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. परंतु, प्रकाश झा यांच्या मते अशा पद्धतीच्या सिनेमांना ठराविक साच्यात बसवणं काही नवीन गोष्ट नाही. कारण २०१० मध्ये आलेल्या त्यांच्या 'राजनीति' या सिनेमालाही अशाच पद्धतीचा सिनेमा म्हटलं गेलं होतं. 


लोक सिनेमाबद्दल जे बोलायचं ते बोलतील. 'द एक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर'मधून काय प्रचार होईल? या सर्वांचा निवडणूक निकालांवर काहीही परिणाम होणार नाही, असं प्रकाश झा यांनी म्हटलंय. या देशात मत देण्याचे किंवा न देण्याचे गणितचं वेगळे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 



काही राजकीय पक्षांची भक्त मंडळी असे सिनेमे बघतीलही परंतु, जर असा सिनेमा मनोरंजक असतील तरच ते मोठी गर्दी गोळा करण्यात यशस्वी होतील, असंही झा यांनी म्हटलंय.  


मृत्यूदंड, गंगाजल, अपहरण असा सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांच्या निर्मितीसाठी प्रकाश झा ओळखले जातात.  


उल्लेखनीय म्हणजे, नरेंद्र मोदी यांना केंद्रबिंदू ठेवत दोन बायोपिक लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होत आहेत. यातील एका सिनेमात भाजप खासदार परेश रावल तर दुसऱ्या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे.