प्रभास आणि अनुष्का शेट्टी अडकले विवाहबंधनात? लग्नाचा फोटो होतोय व्हायरल
अनुष्का शेट्टी आणि प्रभास गेले अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर समोर येत आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या एका फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच 'बाहुबली' आणि 'साहो' या चित्रपटांमुळे सर्वच स्तरांतील प्रेक्षकांच्या मनावर अभिनेता प्रभास (Prabhas) ने राज्य केलं. चित्रपटांसोबतच कायमच त्याच्या खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं.
एक अभिनेता, सेलिब्रिटी म्हणून वावरणारा प्रभास तसा मितभाषीच. अशा या मितभाषी प्रभासचं नाव अभिनेत्री आणि 'बाहुबली' या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) हिच्यासोबत अनेकदा जोडलं गेलं.
त्याचप्रमाणे सध्या प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता अभिनेत्रीनेच यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
अनुष्का शेट्टी बऱ्याच दिवसांपासून ट्विटरवर सक्रिय आहे. तिथे ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देते. काहि दिवसांपूर्वी तिने अभिनेता प्रभासबाबत मौन सोडलं आहे. तिने ट्विटरवर #AskAnushka या सत्राचं आयोजन केलं होतं आणि तिच्या चाहत्यांशी तिच्या 'निशब्धम' चित्रपटाबद्दल तसंच इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितलं.
अनुष्का आणि प्रभासच्या लग्नाचा व्हायरल झालेला फोटो शेअर एका चाहत्याने म्हटलं की, 'कृपया या फोटोवर एका शब्दात सांगा, मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे मॅडम.' यावर अनुष्काने लिहिलं की, 'हा फोटो 'मिर्ची' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचा आहे. हा चित्रपट माझ्या खूप हृदयाजवळ आहे.
केवळ अनुष्काच नाही तर प्रभासनेही अनेक मुलाखतींमध्ये या नात्याच्या अफवांवर सांगितलं आहे. दिलेल्या मुलाखतीत जेव्हा प्रभासला अनुष्काला डेट करत असल्याच्या अफवांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, "ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि त्यावर मी काहीही बोलू इच्छित नाही." प्रभास पुढे म्हणाला की, "जेव्हाही मी लग्न करण्याचा निर्णय घेईन, तेव्हा मी सगळ्यात आधी मीडियाला माहिती देईन."
अनुष्का आणि प्रभासने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. प्रभासने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, दोघंही एकमेकांना जवळपास 11 वर्षांपासून ओळखतात आणि ते ऐकमेकांचे चांगले मित्र आहेत. गंमत म्हणजे अनुष्का शेट्टी आणि प्रभास या दोघांनीही अद्याप लग्न केलेलं नाही. त्यांचा हा फोटो जरी जुना असला तरी सध्या हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.