`ताल जपायचा की तोल...`, प्राजक्ता माळीच्या `फुलवंती`चा ठसकेबास ट्रेलर प्रदर्शित
Phullwanti Trailer : `फुलवंती` या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर झाला प्रदर्शित
Phullwanti Trailer : ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्यानं सर्वांना भुरळ पाडणारी 'फुलवंती' आपल्या भेटीला येतेय. एकीकडे तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर दुसरीकडे 'फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यावरून नजर हटत नाही. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘फुलवंती’ कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे.
‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका; कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात - पेशवे दरबारात येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गश्मीर आणि प्राजक्तामधली जुगलबंदीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आता नेमकं पुढे काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर ट्रेलरमध्ये संजय लीला भन्साळी यांच्या सेटसारखा असा भव्य सेट पाहायला मिळतोय. पण प्राजक्ता आणि गश्मीरमध्ये सुरु असलेल्या या जुगलबंदीचा विजेता कोण ठरणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज व आव्हानावर हा चित्रपट आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध आपण यात पाहणार आहोत.
उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता; यांचा सुंदर मिलाफ असणारी ही कलाकृती रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. 'मराठीत सिनेसृष्टीत नेहमीच उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मीही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय, याचा मला आत्यंतिक आनंद आहे. प्रादेशिक सिनेमे आशयघन असतात, ही बाब मला फार आवडते. एका चांगल्या संकल्पने सोबतच; ताकदीच्या कलाकारांची फौज, उत्तमोत्तम तंत्रज्ञ, संवेदनशील दिग्दर्शन आणि वेगळ्या धाटणीचा तरीही कौटुंबिक असणारा ‘फुलवंती’ हा चित्रपट; लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल',असा विश्वास प्राजक्ताने व्यक्त केला.
या दोघांसह या चित्रपटात प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट,विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज दिसणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत... ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.