`तो त्या ग्रुपमध्ये अॅड झाला नाही आणि 14 दिवसांनंतर...`, या मराठी अभिनेत्रीनं सुशांत सिंह राजपुतविषयी केला मोठा खुलासा
पाहा पाय म्हणाली अभिनेत्री...
मुंबई : अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रार्थना तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. प्रार्थनानं झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ मालिका, खासगी आयुष्य यासोबत आणखी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तिला सुशांत सिंग राजपुतविषयी विचारण्यात आलं होतं.
यावेळी प्रार्थनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला की त्यावेळी तिची प्रतिक्रिया काय होती? या प्रश्नावरही तिने उत्तर देत म्हणाली, 'मला सुरुवातीला सुशांत असं काही करु शकतो हे पटतच नव्हतं. तो हे करुच शकत नाही. कारण ज्या सुशांतला मी ओळखायचे किंवा ज्याला आम्ही जवळून बघितलं होतं, त्याला आयुष्यात खूप काही करायचं होतं. मी, अंकिता आणि सुशांत आम्ही तिघांनी एकत्र खूप वेळ घालवला आहे. अनेकदा रात्री पॅकअॅप झाल्यानंतर आम्ही बँडस्टँडला जाऊन बसायचो. मला अजूनही आठवतंय की तो शाहरुख खानच्या बंगल्याकडे पाहून म्हणायचा की एक दिवस मी याच्या बाजूला घर घेईन. मी खरं सांगते की जेवढं त्याला चित्रपट करणं हे आवडायचं तेवढंच मलाही त्याची क्रेझ होती. आम्ही तासनतास यावर चर्चा करायचो.'
पुढे प्रार्थना म्हणाली, 'त्याचा आणि माझा जन्म एकाच जानेवारी महिन्यातला. तोही विज्ञान शाखेत शिकलेला विद्यार्थी होता आणि मी पण. त्याची ‘काय पो छे’ आणि माझा ‘भटिंडा’ हा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला. अशा अनेक गोष्टी माझ्या आणि त्याच्या आयुष्यातील फारच सारख्या होत्या. आमची मैत्री खूप सुंदर होती. त्याच्या अनेक गोष्टी मला आजही आठवतात. मी अजूनही ते आठवलं की खूप चिडते सुशांतने हे का केलं? बाकी करायला खूप काही होतं. पण स्वत:ला संपवणं हा शेवटचा मार्ग नव्हं.'
डिप्रेशनविषयी बोलताना प्रार्थना पुढे म्हणाली, 'एकेकाळी मी देखील डिप्रेशनमध्ये होते. तेव्हा मी माझ्या मित्राला सांगितले की माझ्या आयुष्यात काहीही घडत नाही. मला हवे ते चित्रपट मिळत नाहीत, भूमिका मिळत नाहीत, अशा अनेक गोष्टी मी त्याला सांगितल्या. पण त्यावेळी त्याने मला समजवून सांगितलं की, तू इथून बघ की इथे कितीतरी लहान लहान घर आहेत, त्यात किती लोक असतील ज्यांना प्रार्थना बेहरे व्हायचं असेल. पण जर तू असा विचार करायला लागली तर मग… ? ते मला फार पटलं. कारण मी एकेकाळी जिथे होती आणि आता जिथे पोहोचली आहे तोपर्यंत मी अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. जे माझ्याकडे नाही आहे ते कधीतरी येईल. पण त्या दिवसापासून आतापर्यंत आणि सुशांतच्या मृत्यूनंतर माझ्या नशिबात असेल ते मिळेल तर कधीही हा विचार केला नाही.'
पुढे प्रार्थना म्हणाली, 'मी गेल्या चार वर्षांपासून त्याच्या संपर्कात नव्हते. अंकिताचा ब्रेकअप झाल्यानंतर तो फार वेगळं राहायला लागला. मी एकदा, दोनदा त्याला फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला होता. कारण आमच्यात अंकिता असायची आणि तिचा विषय निघाला तर ते त्याला आवडायचे नाही. मला यावर नाही बोलायचं असं तो म्हणायचा, पण 1 जूनला पवित्र रिश्ताला 10 वर्षे पूर्ण झाली होती आणि आम्ही एक ग्रुप बनवला होता. त्यात सर्वजण होते फक्त सुशांत नव्हता. मी त्याच्या एका जवळच्या मित्राला सांगितलं की त्याला अॅड कर ना. त्यानंतर अंकितालाही सांगितलं की त्याला अॅड करु तुला चालेल ना? तर तिनेही करा असं म्हटलं. त्यानंतर मी त्याला विचारलं तर त्याला या ग्रुपमध्ये यायचं नव्हतं. त्याच्या 14 दिवसानंतर ही बातमी आम्हाला कळली.'
पुढे प्रार्थना म्हणाली,'जर तो त्या ग्रुपमध्ये अॅड झाला असता ना, तर त्याला त्याचे जुने मित्र भेटले असते आणि छान गप्पा ही रंगल्या असत्या. तो त्यातून बाहेर पडला असता. तो कोणाशी तरी ते बोलला असता? काही तरी झालं असतं? मला इतकं वाईट वाटतं की मी स्वत: पुढाकार घेऊन हे सर्व का केलं नाही? एखादा वेळी कॉन करून मी हे करु शकले असते? जरी तो समोरुन आला नाही तरी मी करु शकले असते. त्यामुळे त्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली की सॉरी, थँक्यू आणि आय लव्ह यू हे मनात ठेवायचं नाही. सरळ बोलून टाकायचं.'