बॉक्स ऑफिसवर रंगणार `ठाकरे` विरुद्ध `मणिकर्णिका`चा सामना
११ जानेवारीनंतर बॉक्स ऑफिसवर दुसरी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे
मुंबई : २०१९ सालातील दोन मोठ्या सिनेमांची २६ जानेवारी रोजी टक्कर होणार आहे. दोन्हीही सिनेमे भारतातील दोन दिग्गजांच्या व्यक्तीरेखेवर आधारित आहेत. एकीकडे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा 'ठाकरे' तर दुसरीकडे कंगना रानौतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' असा सामना बॉक्सऑफिसवर पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षक या दोन्ही सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाला प्राधान्य देणार हे लवकरच समजेल.
मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी
कंगना रानौतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा हा बिग बजेट सिनेमा हिंदी आणि तेलुगु भाषेत २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रानौत हिच्याशिवाय अतुल कुलकर्णी, जिशु सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, डॅनी आणि अंकिता लोखंडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. महाराष्ट्रातील प्रभावी नेत्यांपैंकी एक आणि कार्टुनिस्ट म्हणून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातच नाहीत तर देशातही चर्चेत होते. कोणत्याही पदाशिवाय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या बाळासाहेबांकडे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद होती, हे त्यांचे राजकीय शत्रूही मान्य करतात. २०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला. 'ठाकरे' हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
कमाईचा अंदाज
११ जानेवारीनंतर बॉक्स ऑफिसवर दुसरी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. ट्रेड तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'मणिकर्णिका' जगभारातील ५० देशांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बनवण्यासाठी ११० करोड रुपयांचा खर्च आलाय. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई १३ ते १५ करोड रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
तर दुसरीकडे, ठाकरे या सिनेमासाठी ३० करोड रुपयांचा खर्च आलाय. हा सिनेमा महाराष्ट्रात दणदणीत ओपनिंग मिळवेल, अशी आशा व्यक्त केली जातेय. ट्रेड एक्सपर्टनुसार, 'ठाकरे' या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई ८ ते १० करोड रुपयांवर जाऊ शकेल.