Priya Bapat Umesh Kamat Video: मराठी सिनेसृष्टीमधील सेलिब्रिटी कपल्समध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. अनेक मराठमोळ्या जोड्यांसाठी कपल गोल्स म्हणता येईल असं या दोघांचं नातं आहे. सोशल मीडियावरही हे दोघे प्रचंड लोकप्रिय आहेत. या दोघांची लव्ह स्टोरी आणि त्यांची भेट कशी झाली हे त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. मात्र नुकताच पार पडलेल्या ‘झी मराठी अवॉर्ड 2024’ पुरस्कार सोहळ्यात उमेशने असा काही किस्सा सांगितला की तो ऐकताना प्रियालाच अवघडल्यासारखं झालं. अगदी लाजत तिने चेहऱ्यावर हात ठेवत उमेशला थांबवण्याचाही प्रयत्न केला. मात्र उमेशने हा किस्सा सांगितलाच. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...


प्रियाला बसला धक्का...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंचावर आल्यानंतर उमेशने किस्सा सांगण्यास सुरुवात केली. "आम्ही वांद्रे रेक्लिमेशनला बसलो होतो. सगळ्यांना माहितीच असतील ते स्पॉट वांद्रे रेक्लिमेशनचे," असं म्हणत उमेश कामतने किस्सा सांगायला सुरुवात करताच प्रिया आश्चर्यचकित झाली. त्यानंतर प्रिया उमेशला काहीतरी बोलली. त्यावर त्याने, 'ते नाही सांगत आहे,' असं म्हटलं. पुन्हा प्रेक्षकांशी संवाद साधताना, "काय आहे ना आमचे किस्से खूप जणांना खूप वेळा सांगून झालेत मुलाखतींमध्ये," असं म्हटलं. यावर प्रियाने, "सगळं खरं नसतं सांगायचं," असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेशने किस्सा सुरुच ठेवला, "हा किस्सा 25 वर्षात पहिल्यांदाच बाहेर येत आहे," असं म्हणत उमेशने किस्सा सांगण्यास सुरुवात केली.


पावसाळ्यातील तो फोटो...


"आम्ही बाईक लावून कट्ट्यावर बसलो होतो. हे सगळे लपाव लपवीचे दिवस होतो. दुसऱ्या दिवशी प्रियाचा मला फोन आला घाबरुन. ती मला म्हणाली, उमेश एका पेपरमध्ये असा एक फोटो आला आहे. जनरली फोटो काढतात ना तसा होता. आमचा असा फोटो नव्हता," असं उमेशने सांगितलं. त्यावर प्रियाने फोटोबद्दल सांगताना, "पावसाळा होता. तर रेक्लिमेशनच्या त्या रस्त्यावर बाईक्सवरचे सगळे कपल बसलेले असायचे. त्याचा जनरल फोटो काढलेला होता. तर तो एक फोटो 'मुंबई वृत्तांत'च्या फ्रंट पेजला होता," असं म्हटलं.



या फोन कॉलनंतर...


"आमचं नशीब की पेपरमध्ये झूम वगैरे करायची काही सोय नसते. तर आम्ही दोन दिवस, नाही दिसत आहे आपण. नाही कळणार कोणाला नाही कळणार कोणाला असा दिलासा देत होतो. बहुतेक आमचं भांड फुटतंय आणि घरी कळतंय," असं झालं होतं. "माझ्या मैत्रिणीच्या मावशीने तिला विचारलं होतं की ही प्रिया आहे का?" असं प्रिया म्हणाली. "या फोन कॉलनंतर मी मुंबई वृत्तांतमधलं ते पानच काढून टाकलं," असंही प्रियाने सांगितलं.