प्रियांका-निक अडकले लग्नाच्या बेडीत
विदेशी पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पद्धतीचे कपडे परिधान करता यावे यासाठी प्रियांकाने खास डिझायनरची नेमणूक केली होती.
जोधपूर: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास शनिवारी जोधपुरमध्ये विवाहबद्ध झाले. जोधपुरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन रिवाजांनुसार हा विवाहसोहळा पार पडला. लग्नात प्रियांकाने प्रसिद्ध डिझायनर राल्फ लॉरेनने डिझाइन केलेला आकर्षक गाऊन परिधान केला होता तर निकनेही राल्फनेच डिझाइन केलेला सूट परिधान केला होता, असे सांगण्यात आले.
यावेळी निक आणि प्रियांकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि मोजके नातेवाईक उपस्थित होते. ख्रिश्चन पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर निक आणि प्रियांका यांचा उद्या याच हॉटेलमध्ये भारतीय पद्धतीनेही विवाह होणार आहे. त्याआधी आज रात्री हळदी समारंभ होईल.
लग्नात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पद्धतीचे कपडे परिधान करता यावे यासाठी प्रियांकाने खास डिझायनरची नेमणूक केली होती. इतकंच नाही तर या वऱ्डाही मंडळींसाठी उमेदभवनापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती.
प्रियांका-निक यांच्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर जोधपूरमध्ये पोलिसांकडून विशेष सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रियांका-नीकच्या लग्नाला मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. येथे पाहुण्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. लग्नसमारंभानंतर निक आणि प्रियांकाने दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन ठेवले आहे.