नवी दिल्ली : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रावर काँग्रेस नेता चांगलाच भडकला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...


पुन्हा एकदा प्रियांका वादात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेलेली प्रियांका चोप्रा शॉर्ट ड्रेसमध्ये पहायला मिळाली होती. प्रियांकाच्या पेहरावावरून तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्रियांका वादात सापडली आहे.


काँग्रेस नेत्यांची 'सटकली'


आसाम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं नुकतचं कॅलेंडर लॉन्च करण्यात आलं. या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचा फोटो पाहून काँग्रेस पक्षाचे नेता चांगलेच भडकले आहेत.


आसामची संस्कृती चुकीच्या पद्धतीने सादर


आसामच्या संस्कृतीला चुकीच्या पद्धतीने सादर केलं असल्याचं वक्तव्य कांग्रेस नेत्यांनी प्रियांकाचा ड्रेस पाहून केलं आहे. या कॅलेंडरमधील फोटोत प्रियांका चोप्राने एक फ्रॉक परिधान केल्याचं दिसत आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आसाम राज्याची टुरिझम अॅम्बेसेडर आहे.


ब्रँड अॅम्बेसेडर पदावरुन हटवण्याची मागणी


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विधासभा अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रियांका चोप्राचा ड्रेस पाहून आरोप केला आहे की, आसामच्या संस्कृतीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे. आरोप करणाऱ्यांमध्ये रुपज्योती कुर्मी (आमदार, मरिअनी), रोजलीन टिर्की (आमदार सारुपथर) आणि नंदिता दास (आमदार बोको) यांचा समावेश आहे. तसेच प्रियांकाला ब्रँड अॅम्बेसेडर पदावरुन हटवण्याची मागणीही होत आहे.



टाईम ८ सोबत बोलताना काँग्रेस पक्षाच्या नेत्याने म्हटलं की, फ्रॉक आसाममधील वेशभूषा नाहीये आणि कॅलेंडरवर छापण्यात आलेला फोटो हा असभ्य आहे. फ्रॉक ऐवजी प्रियांकाने पारंपारिक मेखेला चादर घ्यायला हवी होती. 


तर, रिपोर्ट्सनुसार आसाम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन जयंत मल्लाह बरुआ यांनी प्रियांकाचं समर्थन केलं आहे. तसेच प्रियांकाच्या ड्रेसमध्ये काहीही आक्षेपार्ह नाहीये. आसामला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करता यावं यासाठी हे कॅलेंडर बनवण्यात आलं आहे. यासोबतच हे कॅलेंडर अनेक आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटर्सकडेही पाठवण्यात आलं आहे.