`आता हिंदुत्वाची जबाबदारी...` अशी होती आनंद दिघे - राज ठाकरे यांची शेवटची भेट
`आता हिंदुत्वाची जबाबदारी...`, आनंद दिघे - राज ठाकरे यांची शेवटची भेट... तो व्हिडीओ चर्चेत
मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले. कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. 13 मे रोजी दिघे साहेबांचा जीवनपट पडद्यावर आला आणि प्रत्येक जण भावुक झाला.
सध्या सोशल मीडियावर आनंद दिघे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये राज ठाकरे आणि आनंद दिघे यांची शेवटची भेट दिसत आहे, तर व्हिडीओमध्ये सिनेमातील एक सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे.
व्हिडीओमध्ये अपघातानंतर जेव्हा आनंद दिघे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा राज ठाकरे दिघे यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. सीनेमातील याच सीनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ...
तेव्हा आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकने 'हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे' असं राज ठाकरे यांना सांगितलं.' राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो मनसे रीपोर्ट या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, तर व्हिडीओ सुरज आंबेलकर यांनी पोस्ट केला आहे.