मुंबई : राजेश खन्नांचा 'हाथी मेरे साथी' या सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांचा हा सिनेमा क्लासिक सिनेमातील एक उत्कृष्ठ सिनेमा. क्लासिक सिनेमांचा रिमेक येत असल्याची चर्चा होती. अखेर त्याची बातमी समोर आलीच.  ट्रिनिटी पिक्चरच्या बॅनर खाली हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे. हा सिनेमा हिंदी, तेलगु आणि तामिल या भाषेत असणार आहे. 


कोण साकारणार राजेश खन्ना यांची भूमिका?


' हाथी मेरे साथी ' या सिनेमाचा रिमेक करताना राजेश खन्नांची भूमिका कोण साकारणार अशी चर्चा जोरदार रंगली. त्यावर आता उत्तर मिळाले आहे ‘बाहुबली’मध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबत्ती ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकमध्ये राजेश खन्नाची भूमिका  साकारणार आहे. राणाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकमध्ये काम करण्यास मी उत्सूक आहे असं तो म्हटलाय. अर्थात हा रिमेक ओरिजनल चित्रपटापेक्षा पूर्णत: वेगळा असणार आहे. 


मानवाच्या आयुष्यात निसर्गाचे मोठे महत्त्व आहे आणि हाच धागा पडकून मानव आणि हत्ती यांच्यातील एका अनोख्या नात्याची कथा यात दिसेल, असे राणाने सांगितले.  तामिळ दिग्दर्शक प्रभू सोलोमन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणे अपेक्षित आहे. या बिग बजेट चित्रपटात अ‍ॅक्शन दृश्यांची भरमार असल्याचे कळते. शिवाय देश-विदेशात चित्रपटात चित्रीकरण होईल.


सिनेमाचा इतिहास 


‘हाथी मेरे साथी’ हा ओरिजनल चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झाला होता. तामिळ दिग्दर्शक एमए थिरूमुगम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सलीम जावेद या जोडीने या चित्रपटाची कथा लिहिली होती. पुढे या जोडीने अनेक हिट कथा दिल्यात. राजेश खन्ना आणि अभिनेत्री तनुजा यात लीड रोलमध्ये दिसले होते. त्यावर्षांतला राजेश खन्ना यांचा हा सर्वाधिक सुपरहिट सिनेमा होता. विशेष म्हणजे, १९६९ ते १९७१ या वर्षांत राजेश खन्ना यांनी एकापाठोपाठ एक असे १७ हिट सिनेमे दिले होते. ‘हाथी मेरे साथी’ त्यापैकीच एक होता.