`संजू` च्या प्रदर्शनानंतर रणबीर कपूर आई नीतू सिंगसोबत होणार फ्रान्सला रवाना...
बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर सध्या संजू सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
मुंबई : बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर सध्या संजू सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर तो ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करेल. पण त्यापूर्वी आई नीतू कपूरसोबत तो फ्रान्सला जाणार आहे. त्याचे कारणही तसे खास आहे. वडील ऋषी कपूर, आजी कृष्णा राज, बहीण रिद्धिमा साहनी आणि भाची समारा यांच्यासह रणबीर फ्रान्सला रवाना होणार आहे.
काय आहे कारण?
याचे कारण म्हणजे नीतू कपूरचा ६० वा वाढदिवस. नीतू कपूरचा ६० वा वाढदिवस पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला जाईल. नीतू कपूरचा बर्थडे ८ जुलैला असून खुद्द ऋषी कपूर या ट्रिपची तयारी करत आहेत. वाढदिवसाच्या दोन दिवसाआधी म्हणजेच ६ जुलैला संपूर्ण कपूर कुटुंबिय पॅरिसला जातील. पॅरिसमध्ये बर्थडे सेलिब्रेशनला जाण्यापूर्वी नीतू कपूर लंडनला जाणार आहेत. तिथे मुलगी रिद्धिमा साहनीसोबत काही वेळ घालवतील.
आलियाची ही हजेरी?
नीतू कपूरच्या या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आलिया भट्टही सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. बुल्गारियात आलियाच्या सरप्राईज बर्थडे पार्टीत नीतू कपूरही सहभागी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून रणबीर-आलियाच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर दोन्ही कुटुंबिय म्हणजेच भट्ट आणि कपूर कुटुंबिय सहमती दर्शवताना दिसत आहेत.
आलिया-रणबीर व्यस्त
आलिया सध्या करण जोहरच्या कलंक सिनेमाचे शूटिंग करत आहे. सेटवर जीन्यावरुन पडल्यामुळे तिला दुखापत झाली होती. तर एकीकडे रणबीरही संजू सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ही ट्रिप दोघांनीही व्यस्त शेड्यूलमधून छानसा ब्रेक देईल.