मुंबई : एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल यांच्या जीवनाला आकार मिळताना दिसत आहे. अनेक वर्ष हालअपेष्ठा सहन केल्या पण त्यांच संगितावरचं प्रेम कधीही कमी झालं नाही. त्यांच्या चर्चा सध्या सर्वत्र जोर धरत आहेत. त्यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट साकारण्यात येणार आहे. रानूंच्या प्रवासाची कथा दिग्दर्शक ऋषिकेश मंडल बायोपिकच्या माध्यमातून जगा समोर आणणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रानूंच्या बायोपिक मध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्ती मुख्य भूमिका साकारणार आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. 'मला या चित्रपटाबद्दल विचारणा करण्यात आली आहे. परंतु अद्यापही मला चित्रपटाची स्क्रिप्ट प्राप्त झालेली नाही. स्क्रिप्ट वाचल्यानंतर हा चित्रपट करायचा का नाही हे ठरवेल' अशा प्रकारे तिने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


त्याचप्रमाणे खुद्द रानू यांना देखील चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. परंतु याबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जर सुदिप्ताने चित्रपटात भूमिका साकारण्यास होकार दिला, तर लवकरच अन्य स्टारकास्ट देखील घोषित करण्यात येतील. असे ऋषिकेश यांनी सांगितले आहे. 


चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरूवात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस करण्यात येणार आहे. रानूंच्या बायोपिकमधील काही भाग त्यांच्या गावी शूट करण्यात येणार आणि काही भाग मुंबईत शूट करण्यात येणार आहे. 


चित्रपटाची निर्मिती शुभोजित मंडल करणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रानू मंडल यांच्या आयुष्याचा प्रवास रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.