मुंबई : आजच्या जगात सोशल मीडिया हे इतकं प्रभावी माध्यम झालं आहे की, काही लोक एका रात्रीतच प्रसिद्ध झाले. तर या सोशल मीडियामुळे काही लोकांचं आयुष्यच बदललं आहे. असंच काहीसं कोलकात्यामधील रानूसोबत झालं आहे. स्टेशनबाहेर आपल्या जबरदस्त आवाजात लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गायलेली रानू आज इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमुळे रानू, त्यांची कला, त्यांचा आवाज संपूर्ण जगासमोर आला. आता रानू यांचा एक व्हिडिओ युट्यूबवर दुसऱ्या क्रमांवर ट्रेंडिंग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रानू यांचा सोनी टीव्हीवरील 'सुपरस्टार सिंगर' या कार्यक्रमातील एका व्हिडिओ यूट्यूबवर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की, युट्यूबच्या ट्रेंडिंगमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 


या कार्यक्रमादरम्यान निवेदक जय भानुशालीने जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनवर गाणं का गाता? असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्या म्हणाल्या की, 'मी रेल्वे स्टेशनवर गाणं गात होती, कारण माझ्याकडे राहण्यासाठी घर आणि पोट भरण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा कोणी बिस्किटं देवून जात असत, तर कोणी पैसे.' अशी मन हेलावून टाकणारी गोष्ट त्यांनी 'सुपरस्टार सिंगर'च्या मंचावर शेअर केली. 



कोलकोत्यातील एका रेल्वे स्टेशनवर रानू मंडल यांचा, लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गातानाचा व्हिडिओ अतिंद्र चक्रवर्ती या प्रवाशाने शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ अगदी काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाला आणि बघता बघता रानू हा चेहरा सर्वांपर्यंत पोहचला.