दिवाळी आणि ख्रिसमसला थिएटरमध्येच प्रदर्शित होतील `हे` चित्रपट
`अंग्रेजी मीडियम` चित्रपटानंतर रुपेरी पडद्यावर एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.
मुंबई : कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच कामकाज बंद आहे. आता हळू-हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना या महामारीचा सर्वात मोठा फटका बॉलिवूडला देखील बसला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून थिएटरमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा तारखा पुढे ढकलाव्या लागल्या.
अभिनेत्री करिना कपूर खान आणि अभिनेता इरफान खान स्टारर 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटानंतर रुपेरी पडद्यावर एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मात्र या वर्षी दोन मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं समजतंय. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगचा ’83’ हे दोन चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहेत.
खुद्द INOX ने ही महत्त्वाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 'लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’आणि कबीर खान दिग्दर्शित '83’ चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होतील. ' असं INOX ने म्हटलं आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’चित्रपट दिवाळीला तर कबीर खान दिग्दर्शित '83’ चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.