मुंबई : क्रिकेट विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव पुन्हा एकदा कोरलं गेलं. पण हे नाव कोणत्याही क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने नसून एका चित्रपटाच्या निमित्ताने कोरण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह लवकरच '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटातील अनेक फोटो समोर आले आहेत. मात्र आता रणवीरने या चित्रपटातील एक खास क्षण शेअर केला आहे. हा क्षण संपूर्ण देशासाठी अतिशय खास आहे. रणवीरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो वर्ल्डकपची ट्रॉफी हातात घेऊन दिसतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर देशभरात आनंद साजरा केला जात होता. त्यावेळी पहिल्यांदा इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देव यांनी हातात ट्रॉफी घेतलेला तो फोटो देशवासियांसाठी मोठी गर्वाची बाब आहे. रणवीरने त्याच क्षणाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत रणवीरने '#ThisIs83' असं लिहिलंय. फोटोमध्ये रणवीर कपिल देव यांच्यासारखाच दिसतोय.


सोशल मीडियावर रणवीरचा हा फोटो जबरदस्त व्हायरल होतोय. लोक रणवीरसोबत कपिल देव यांचा फोटोही शेअर करताना दिसतायेत. 



'८३' चित्रपट १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट टीमने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित आहे. कबीर खानने '८३' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात कपिल देव आणि रोमी या दोघांचाही लूक समोर आला आहे.



चित्रपटात रणवीर, दीपिकाशिवाय साकिब सलीम, एमी विर्क, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, चिराग पाटिल, पंकज त्रिपाठी, आदिनाथ कोठारे, जीवा हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. '८३' १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.