मुंबई : परिस्थिती कधी आणि कशी बदलेल याचा काही नेम नसतो. मुळात नशीबाने कोणासाठी पुढच्याच क्षणाला काय वाढून ठेवलं आहे हे सांगता येणंही तसं कठीणच. अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला आहे एका रिऍलिटी शोच्या विजेत्याला. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' या गायनाच्या रिऍलिटी शोमध्ये जयपूरच्या अजमत हुसैन याने बाजी मारली होती. अतिशय कमी वयात त्याने दमदार आवाजाच्या बळावर भल्याभल्यांना थक्क केलं होतं. पण, काळानुरुप परिस्थिती बदलली, प्रसिद्धीझोतात असलेला अजमत केव्हा या विश्वापासून दुरावत गेला हे कळलंही नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला तो सोनी वाहिनीवरील 'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी आला आहे. या वाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओतून अजमतने २०११ ते २०१९ या दरम्यानच्या वर्षांमध्ये नेमका कोणत्या प्रसंगांचा सामना केला हे तो स्वत: सांगताना दिसत आहे. 


मुख्य म्हणजे या स्पर्धेच्या परीक्षकपदी असणाऱ्या विशाल ददलानी आणि नेहा कक्कड यांनी अजमतला ओळखलं होतं. ज्यानंतर त्याने आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली. रिऍलिटी शो जिंकल्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर करण्यास सुरुवात केल्याचं सांगत पैसे कमावूनही काही बाबतीत पैशांची चणचण जाणवतच होती. ज्यामुळे काहीतरी वेगळं करण्याच्या निर्णयावर आपण पोहोचल्याचं अजमतने सांगितलं. 


वाढत्या वयामुळे त्याचा आवाज बदलत होता, ज्यामुळे अनेकांनी थेट त्याच्या गायनकौशल्यावरच प्रश्न उपस्थित केला. या साऱ्याचा परिणाम म्हणजे अजमतला नैराश्याचा सामना करावा लागला. वाईट परिस्थितीचाच फायदा घेऊन काही वाईट प्रवृत्तीच्या मुलांनी त्याला अमली पदार्थांची सवय लावली. अजमत व्यसनाधीन गेला. त्याच्या प्रसिद्धीपासून ईर्ष्या असणाऱ्यांनी अखेर त्यांच्या वाईट कटकारस्थानांना मार्गी लावलं होतं. अजमत चुकीच्या वाटेवर गेला होता. 



पुढे आपल्यासोबतच्याच एका मित्राला पाहून पुन्हा एकदा या कलेकडे वळण्याचा निर्धार करत अजमतने सर्व वाईट प्रवृत्तींचा सामना केला. त्यांना मागे सारत आज पुन्हा तो त्याच्या पायावर उभा राहू पाहत आहे, पुन्हा एक नवी सुरुवात करु पाहत आहे. तेव्हा आता अजमत यात कितीपत यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.