सुशांतच्या `या` आठवणीने आजही अंगावर शहारे येतात, रेमो डिसोजाने सांगितली खास आठवण
सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह 14 जूनला मृतावस्थेत आढळला
मुंबई : कोरिओग्राफर ते आता फिल्ममेकर बनलेल्या रेमो डिसोजाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांतचं 14 जूनला निधन झालं. सुशांतला रेमोसोबत डान्स फिल्म करायची होती. याबाबत आजही विचार करून रेमोच्या अंगावर शहारे निर्माण होत आहेत. रेमो डिसोजा आजही याबाबत खंत व्यक्त करतो की त्याला सुशांतसोबत एक डान्स फिल्म करायचा होता. सुशांत एक उत्तम डान्सर होता. सुशांत स्टेजवर गेल्यावर सगळ्यांना मंत्रमुग्ध करत असे.
रेमोने सांगितली ही गोष्ट
रेमो म्हणाला की, सुशांतला एक डान्स सिनेमा करायचा होता. सुशांत जेव्हा डान्स शो डान्स प्लसमध्ये आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता आला होता. त्या दरम्यान त्याने रेमोला सांगितलं की,'चल एक डान्स सिनेमा तयार करू.' आज रेमो त्यावर खंत व्यक्त करतो. मला तो सिनेमा बनवायला मिळाला असता तर बरं झालं असतं.
रेमो आणि सुशांतची एक खास मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये सहज गप्पा मारताना सुशांतने आपण उत्तम डान्सर असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आपण एक छान डान्सवर आधारित सिनेमा करूया. आजही ही गोष्ट रेमोला आठवते आणि याचं त्याला प्रचंड वाईट वाटतं.
सुशांतच्या मृत्यूला आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण अभिनेत्याचे कुटुंबिय, जवळचे मित्र आणि चाहते अद्याप या दु:खातून बाहेर आले नाहीत. चाहते दररोज त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर करत असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे सुशांतच्या स्वप्नांची यादी. एकदा सुशांतने स्वत: चाहत्यांना त्याच्या 50 स्वप्नांची माहिती दिली होती. त्याने स्वतः आपल्या आयुष्यात 50 स्वप्नं पाहिली होती. याबाबत त्याने 14 सप्टेंबर 2016 रोजी स्वतः ट्विट करत आपल्या 50 स्वप्नांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्याने 12 स्वप्नांना गवसणी घालून 38 स्वप्नं अपूर्ण ठेवत निरोप घेतला.