जेलमधून परतल्यानंतर आर्यन खानला मोठा धसका
२५ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानसाठी तुरुंगातील अनुभव धक्कादायक होता
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर जवळपास महिनाभर तुरुंगात होता. २५ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानसाठी तुरुंगातील अनुभव धक्कादायक होता आणि यातून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागू शकतो असं सांगण्यात येत आहे. शाहरुख खानच्या कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे की, तुरुंगातून परतल्यानंतरही आर्यन अजूनही 'शॉक'मध्ये आहे.
एका रिपोर्टनुसार, तुरुंगातून परतल्यानंतर आर्यन पूर्णपणे शांत आणि एकटा राहू लागला आहे. सुत्रानूसार, आर्यन कोणाशीही जास्त बोलत नाही आणि एकटा राहतो. आर्यन बहुतेकवेळा त्याच्या खोलीतच राहतो आणि त्याला बाहेर जाऊन मित्रांना भेटण्यात इंट्रेस्टही नसतो. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आर्यन आधीच खूप शांत होता. पण जेलमधून परतल्यानंतर तो पूर्णपणे शांत झाला आहे.
अलीकडेच, अशीही बातमी समोर आली होती की, शाहरुख खान आपला मुलगा आर्यनच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहे आणि त्याची सुरक्षा वाढू देखील शकते. मात्र, कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी याचा स्पष्टपणे नाकारलं आहे. त्यांनी सांगितलं की, आर्यनसाठी खास बॉडीगार्ड ठेवण्याची अजून कोणतीही योजना नाही. सध्या शाहरुख आर्यनसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे आणि त्याने अद्याप त्याच्या चित्रपटांचं शूटिंग पुन्हा सुरू केलेलं नाही.
2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकून आर्यनला अटक केली होती. याचबरोबर आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली होती. या तिन्ही आरोपींची जामिनावर सोडण्यात आलं आहे.