इतिहासजमा होणार सूपरहिट सिनेमाचा साक्षीदार आर. के स्टुडिओ
आर के स्टुडिओ विकला जाणार
मुंबई : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचा साक्षीदार असलेला आर. के. स्टुडिओच्या आता फक्त आठवणी उरणार आहेत. कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्टुडिओचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर यांनी घेतला आहे.
ऋषी कपूर यांनी या बातमीला दुजोरा देखील दिला आहे. आर.के. स्टुडिओला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत अनेक गोष्टींचं नुकसान झालं होतं. त्यामुळे तो परत उभा करणं कठीण असल्याने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतल्याचं कळतं आहे. राज कपूर यांनी हा स्टुडिओ बनवला होता. अनेक सिनेमांचा हा स्टुडिओ साक्षीदार आहे.
सुपर डान्सर या डान्स रिअॅलिटी शोच्या सेटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. संपूर्ण स्टेज यामध्ये जळून खाक झाला होता.
आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम येथे संग्रहीत ठेवण्यात आले होते. नरगिसपासून तर ऐश्वर्यापर्यंतचे कॉन्च्युम येथे होते. पण आगीमध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं होतं.