मुंबई : मनमौजी असा तो आणि देखणी अशी ती...  त्या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलतो... पण एका विचित्र परिस्थिती निर्माण होते. हा अडथळा दूर करण्यात ते यशस्वी होतात का, त्यांना त्यांचं प्रेम मिळतं का, अशी हलकीफुली कथा रॉमकॉम या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. 

 

ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म आणि कास्टिंग एजन्सी यांनी रॉमकॉम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते, सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटात  विजय गिते आणि मधुरा वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील,श्वेता नाईक,स्वाती पानसरे,फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे,सिद्धेश्वरा आणि असित रेडीज अशी दमदार स्टारकास्ट आहे. 


चित्रपटाच्या ट्रेलरमधून या चित्रपटाची रंजक कथा आपल्यासमोर येते. त्यामुळेच हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करेल यात शंका नाही. नात्याचे विविध पदर उलगडणारी ही प्रेमकथा येत्या १८ ऑक्टोबरला  रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.