तो सुपरस्टार! पण रणरणत्या उन्हात पायात चप्पल का घालत नाहीय?
या अभिनेत्याच्या समर्पणाचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
मुंबई : सध्या उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे, की विचार करुनही घाम फुटतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. पण, या कशातीची तमा न बाळगता एका अभिनेत्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत.
ब्लॉकबस्टर चित्रपट साकारणाऱ्या एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या RRR या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. 800 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटानं दाक्षिणात्य कलाकारांना पुन्हा एकदा चांगल्याच प्रसिद्धीझोतात आणलं आहे.
ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या चाहत्यावर्गात पुन्हा एकदा भर पडली. सध्याच्या घडीला ही मंडळी चित्रपटाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.
अशाच एका कारणासाठी म्हणून अभिनेता राम चरण याला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी चाहत्यांची नजर त्याच्या पायांवर गेली.
बरं याच कारणामुळे त्याचं तोंड भरून कौतुकही केलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये राम चरण अनवाणी दिसत आहे.
सर्वप्रथम तर त्यानं असं का केलं असाच प्रश्न चाहत्यांनी केला. पण, त्यांच्यापुढे जेव्हा यामागचं कारण आलं तेव्हा मात्र त्याची सर्वांनीच प्रशंसा केली.
राम चरण अनवाणी का?
सूत्रांच्या माहितीनुसार राम चरण यानं 41 दिवसांसाठी अय्यप्पा स्वामींची दिक्षा घेतली आहे. असं करणारा दर दिवशी 41 दिवसांसाठी अनवाणी असतो.
शिवाय चामड्यापासून तयार केलेली कोणतीही वस्तू परिधान करत नाही, अंथरुणावर झोपतही नाही.... राम चरणही हे सर्व पाळत असल्याचं म्हटलं जात आहे.
हा अतिशय खडतर असा उपवास राम चरण करत असल्याचं पाहून चाहत्यांनी या अभिनेत्याच्या समर्पणाचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
इतका नम्र अभिनेता आम्ही आजवर पाहिला नाही. भारतीय संस्कृतीप्रती याची ओढ प्रशंसनीय आहे... अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे.